पिंपरी : पिंपरीतील भाजी मंडईत रात्री चोरीचे प्रकार घडू लागले आहेत. भाजी विक्रेत्यांनी त्यांच्या गाळयाजवळ ठेवलेल्या भाजी साठ्यातील भाजी तसेच फळे चोरणारे टोळके कार्यरत आहे. हे टोळके चोरी करतेवेळी सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाले आहे. कोणीही चोरीप्रकरणी तक्रार दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी अद्याप दखल घेतलेली नाही.
पिंपरीतील भाजी मंडई हे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासाठीचे मध्यवर्ती केंद्र आहे. या ठिकाणी महापालिकेने बांधलेल्या मंडईत भाजी विक्रेत्यांना गाळे देण्यात आले आहेत. भाडे पट्यावरील या गाळ्यांमध्ये विक्रेते त्यांचा माल ठेवतात. भाजी, फळे असा साठा त्या ठिकाणी असतो. विक्रेते गाळा बंद करून घरी गेल्यानंतर रात्री गाळयातील भाजी तसेच अन्य माल चोरीस जाण्याच्या घटना गेल्या पाच सहा महिन्यांपासून वाढल्या आहेत. सहा महिन्यांपुर्वी अशाच प्रकारे मंडईत चोरीचे प्रकार घडल्याबद्दल विक्रेत्यांनी आवाज उठविला होता. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते.त्यामुळे विक्रेते तसेच भाजी मंडई विक्रेता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली होती. मंडईत सद्या सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आली आहे. बुधवारी रात्री दोन ते तीन जणांच्या टोळक्याने मंडईत भाज चोरली, ही घटना कॅमेरॅत कैद झाली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरॅत चोरटे कैद झाल्याचे फुटेज भाजी विक्रेत्यांनी पोलिसांना पाठविले आहे. ज्यांची चोरी झाली त्या संबंधित विक्रेत्यांच्या तक्रारी दाखल करून घेऊन फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेता येईल, पुढील कारवाई करणे शक्य होईल. असे पिंपरी पोलिसांनी सांगितले.