पिंपरी : शहरातून जुन्या पुणे-मुंबईचा प्रशस्त रस्ता जातो, उड्डाणपूल, ग्रेड सेपे्रटर अशी दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा अशी शहराची ओळख आहे. मात्र, बीआरटी प्रकल्प वेळेत पूर्ण नाही, त्यातच मेट्रोच्या कामाची घाई केल्याने महामार्गावर निगडी ते दापोडीपर्यंतच्या मार्गावर अडथळ्यांची शर्यत पार करीत वाहनचालकांना मार्ग शोधावा लागतो. त्यात रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी घेऊन जाणा-या रुग्णवाहिकांनाही कोंडीचा फटका बसत आहे.गेल्या दोन वर्षांपासून बीआरटी मार्ग लवकरच खुला होईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून दिले जात आहे. सांगवी, किवळे, रावेत हे मार्ग अपवाद वगळता बीआरटी मार्ग खुला होऊ शकला नाही. या उलट या बीआरटी मार्गावर नेहमीच नवनवे प्रयोग केले. पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. मात्र याच मार्गावर ठिकठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. बीआरटी मार्ग चिंचवड तसेच आकुर्डी या ठिकाणी खुला केला असल्याचे जाहीर केले आहे. मात्र या मार्गाने काही अंतर पुढे गेल्यास वाहनचालकाला पुन्हा नेहमीच्या रस्त्यावर यावे लागते. पुढे काही अंतरावर अडथळ्याला सामोरे जावे लागणार असा अंदाज बांधून अनेक वाहनचालक खुला करण्यात आलेल्या बीआरटी मार्गाचा वापर करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे बीआरटी मार्ग खुला केला असला तरी तो निरुपयोगी ठरू लागला आहे.मेट्रोचे काम सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी आहे़ मात्र आताच जागा अडवून ठेवण्यात आली आहे. बºयाच ठिकाणी मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेडस उभे केले आहेत. ते बॅरिकेडस नियमितच्या रस्त्यास अडथळा ठरू लागले आहेत. आहे तो रस्ता अरुंद झाल्याने वाहनांना या मार्गावरून जाताना कसरत करावी लागत आहे. वेळ आणि पैसा खर्च होईल असा हा मार्ग बनला असून, वारंवार अपघातही घडू लागले आहेत.महापालिका प्रशासन व महामेट्रोचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.उड्डाणपुलाचे काम अडथळ्याविना-कासारवाडी नाशिक फाटा येथे उद्योजक ज़े आऱ डी़ टाटा उड्डाणपुलाचे काम तीन वर्षांहून अधिक काळ सुरू होते. मात्र हे काम सुरू असताना वाहतुकीस कधीच अडथळा झाला नाही. त्याचबरोबर उड्डाणपुलाच्या कामामुळे कधी अपघातही घडून आला नाही. अपघात आणि वाहतुकीस अडथळा विरहित उड्डाणपुलाचे काम केले. बीआरटी आणि मेट्रोच्या कामामुळे मात्र नागरिक हैराण झाले आहेत.
पिंपरी : रुग्णवाहिकेला मिळेना रस्ता; अपूर्ण बीआरटी, मेट्रोच्या कामांची घाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 4:45 AM