पिंपरी :तांत्रिक बिघाड झाल्याने महापौर नितीन काळजे यांच्यासह तीन नगरसेविका लिफ्टमध्ये बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास अडकल्या. महापालिका प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्येच अडकल्याने मदतीसाठी धाव घेतलेल्या सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. साधारण दहा ते पंधरा मिनिटे लिफ्टमध्ये अडकलेल्या महापौरांना तसेच नगरसेविकांना लिफ्टमनच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. महापालिका भवनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी महापौर काळजे सकाळीच महापालिकेत आले. हा कार्यक्रम झाल्यानंतर ते लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर महापौर कक्षाकडे निघाले. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यामध्ये काही अंतरावर लिफ्ट अडकली. महापौर नितीन काळजे यांच्याबरोबर अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, कमल घोलप या नगरसेविकासुद्धा लिफ्टमध्ये अडकल्या होत्या. महापौर लिफ्टमध्ये अडकल्याचे समजताच सुरक्षा रक्षकांनी धावाधाव केली. लिफ्टमनच्या मदतीने दुसऱ्या मजल्यापर्यंत नेण्यात आली. दुसऱ्या मजल्यावर अखेर महापौर आणि नगरसेविका लिफ्टमधुन सुखरूप बाहेर काढण्यात आले. तीन आठवड्यापूर्वी एक पत्रकार वीस मिनिटे लिफ्टमध्ये अडकून पडला होता. तर चार महिन्यापूर्वी लिफ्टमध्ये पाय अडकल्याने एका कर्मचाऱ्याच्या पायाला दुखापत झाली होती. लिफ्टमधील तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधून दुरूस्ती करावी, अशा सूचना महापौर काळजे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
पिंपरीचे महापौर अडकले लिफ्टमध्येच ; सुरक्षा रक्षकांची उडाली तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 2:36 PM
साधारण दहा ते पंधरा मिनिटे लिफ्टमध्ये अडकलेल्या महापौरांना तसेच नगरसेविकांना लिफ्टमनच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले.
ठळक मुद्देतीन आठवड्यापूर्वी एक पत्रकार वीस मिनिटे लिफ्टमध्ये अडकल्याची घटना