पिंपरी : महापालिकेचे प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची नाशिक महापालिकेत उपायुक्त म्हणून तर क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन कापडणीस यांची नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मंगळवारी (दि. १२) बदलीचे आदेश काढले आहेत. डोईफोडे ५ आॅगस्ट २०१४ रोजी पिंपरी पालिकेत रूजू झाले होते. त्यांच्याकडे प्रशासन व एलबीटी विभागाचा पदभार होता. त्यांची १२ फेबुवारीला लातूर जिल्हातील उदगीर नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. मात्र, या ठिकाणी ते रुजू झाले नव्हते. त्यांना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने ३१ मेपर्यंत पिंपरी पालिकेत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्याने अखेर त्यांची मंगळवारी नाशिक महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. डोईफोडे यांच्या जागी उदगीर नगरपालिकेतून बदली होऊन आलेले नितीन कापडणीस यांची अवघ्या तीन महिन्यामध्येच नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्याकडे क्रीडा विभाग व क्षेत्रीय कार्यालय अधिकारी म्हणून पदभार होता. कापडणीस यांची केवळ तीन महिन्यात बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पिंपरी पालिकेत ११ सहाय्यक आयुक्त आहेत. त्यात ६ शासनाने दिलेले प्रतिनियुक्तीवरील ५ महापालिकेचे अधिकारी आहेत. डोईफोडे व कापडणीस यांची बदली झाल्याने राज्य सेवेतील दोन सहाय्यक आयुकतांची पदे रिक्त झाली आहेत. पिंपरी पालिकेत राज्य सरकारच्या सेवेतील 'सीईओ' केडरचे चार सहायक आयुक्त कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, नागरवस्ती विभागाच्या सहायक आयुक्त आणि 'ग' क्षेत्रिय कार्यालयाच्या क्षेत्रिय अधिकारी स्मिता झगडे, आकाश चिन्ह विभागाचे विजय खोराटे, भूमी, जिंदगी विभागाचे मंगेश चितळे हे चार अधिकारी प्रतिनियुक्तीवरील आहेत. तर पालिकेतील आरोग्य अधिकारी मनोज लोणकर, सुरक्षा विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आशादेवी दुरगुडे, 'ब' प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी संदीप खोत, 'क' प्रभागाचे अण्णा बोदडे, झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग आणि कामगार कल्याण विभागाचे चंद्रकांत इंदलकर असे पाच सहायक आयुक्त आहेत.
पिंपरी महापालिकेच्या प्रशासन विभागाचे महेशकुमार डोईफोडे यांची अखेर नाशिकला बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 6:31 PM
डॉ. महेशकुमार डोईफोडे ५ आॅगस्ट २०१४ रोजी पिंपरी पालिकेत रूजू झाले होते. त्यांच्याकडे प्रशासन व एलबीटी विभागाचा पदभार होता.
ठळक मुद्देराज्य सेवेतील दोन सहाय्यक आयुकतांची पदे रिक्त पिंपरी पालिकेत ११ सहाय्यक आयुक्त