पिंपरी : महापौरपदाचे आरक्षण आज जाहीर झाले. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील २१ जणांपैकी कोणास संधी मिळणार? महापौरपद पिंपरी, चिंचवड की भोसरी विधानसभेत कोणास मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. २१ नोव्हेंबरला महापौर आणि उपमहापौर निवड होणार आहे. राज्यातील २७ महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबईत काढण्यात आली. आरक्षण सोडत राज्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांच्यासह अनेक महापालिकांतील महापौर, सत्तारूढ पक्षनेते, स्थायी समिती सभापती या वेळी उपस्थित होते. आरक्षण सोडतीत पिंपरी-चिंचवडचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी असल्याची चिठ्ठी काढण्यात आली.
अशी आहे निवड प्रक्रिया....महापौर निवडीसाठी २१ नोव्हेंबरला विशेष सभा होणार असून, गुरुवारी विभागीय आयुक्तांच्या अनुमतीने पीठासन अधिकाºयांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबरला दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. त्यानंतर सर्वसाधारण सभेत निवडीचा कार्यक्रम होणार असून, त्यात सुरुवातीला माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी असणार आहे. माघारीच्या मुदतीनंतर निवडणूक प्रक्रिया होणार आहे. याचवेळी उपमहापौर निवडही होणार आहे. सर्वसाधारण खुल्या महिला गटात २१ महिलांचा समावेश महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण खुला गटातील महिलेसाठी आरक्षित आहे. महापालिकेत भाजपाची एकमुखी सत्ता आहे. त्यामुळे महापौर हा भाजपाचाच होणार आहे. सर्वसाधारण महिला गटातून एकूण २९ महिलांनी निवडणूक लढविली. त्यात २१ महिला या सत्ताधारी भाजपाच्या आहेत. त्यात शैलजा मोरे, माई ढोरे, नीता पाडाळे, शर्मिला बाबर, संगीता भोंडवे, आरती चौंधे, सुजाता पालांडे, माया बारणे, प्रियंका बारसे, सोनाली गव्हाणे, सारिका सस्ते, निर्मला गायकवाड, भीमाबाई फुगे, माधुरी कुलकर्णी, करुणा चिंचवडे, कोमल मेवाणी, सुनीता तापकीर, निर्मला कुटे, चंदा लोखंडे, सीमा चौगुले, साधना मळेकर यांचा समावेश आहे. त्यापैकी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. ........नेत्यांचे उंबरे झिजविण्याचे काम सुरू आरक्षणाची सोडत जाहीर होताच सर्वसाधारण महिला गटातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे आमदार, खासदार आणि भाजपाच्या नेत्यांचे उंबरे झिजविण्याचे काम इच्छुकांनी सुरू केले आहे. तर सर्वसाधारण गटातून इतर प्रर्वगातील महिलांनी निवडणूक लढविली आहे. त्यामुळे अन्य गटातील महिलांचाही दावा महापौरपदावर होऊ शकतो. .....महापौरपदी निष्ठावंतांना संधी मिळणार का?भारतीय जनता पक्षाची महापालिकेत सत्ता आल्यानंतर महापौरपद हे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे आमदार महेश लांडगे गटाचे नितीन काळजे त्यानंतर राहुल जाधव यांची महापौरपदी निवड झाली होती. जाधव यांचा कालावधी तीन महिन्यांपूर्वीच संपला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे तीन महिन्यांची मुदतवाढ जाधव यांना मिळाली होती. ती मुदत संपून नवीन महापौर निवड होणार आहे. गेली अडीच वर्षे दोन्ही महापौर भोसरी विधानसभेतील झाले. तर उपमहापौर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील शैलजा मोरे, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सचिन चिंचवडे यांना संधी मिळाली होती. गेल्या तीन वर्षांत स्थायी समितीपदी आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांकडे होते. त्यामुळे महापौरपद चिंचवड, पिंपरी की भोसरीला मिळणार याबाबत उत्सुकता आहे.........महापौर आरक्षण सोडत झाली आहे. त्यानुसार सर्वसाधारण खुल्या गटातील महिला असे आरक्षण निघाले आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया प्रशासनाकडून केली जाईल. खुल्या गटात भाजपाच्या २१ सदस्यांचा समावेश आहे. याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून, प्रदेशच्या नेत्यांचे मार्गदर्शन घेऊन कोणास संधी द्यायची हे ठरविले जाणार आहे. - एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते