- शीतल मुंडेपिंपरी : शहरातील मुख्य रस्ते व चौकात तसेच पदपथांवर हातगाडी, पथारीवाले, अन्य विक्रेते आणि व्यावसायिकांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे बहुतांश भागातील पदपथांचा श्वास कोंडलेलाच आहे. परिणामी शहरातील अशा अतिक्रमण झालेल्या रस्त्यांवर सातत्याने वाहतूककोंडी व अपघाताचे प्रमाण वाढत असूनही महापालिका प्रशासन व वाहतूक विभाग कारवाईबाबत उदासीन आहे. कारवाईचा केवळ दिखावा करण्यात येत आहे. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक नेमके काय करते, असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.पिंपरीतील शगुन चौक शहरातील मुख्य बाजार पेठ आहे. या चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याचे दिसून येते. चिंचवडच्या चापेकर चौकातील उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेत हातगाडीधारक, व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. पदपथही बळकावण्यात आले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना भर रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्यांची कसरत होत आहे. तसेच त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.अतिक्रमण निर्मूलन कारवाई झाल्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होते. शहरातील मुख्य चौकांमध्ये सायंकाळी हातगाडी, पथारीवाले मोठ्या संख्येने ठाण मांडून असतात. पुणे- मुंबई महामार्गाच्या सेवा रस्त्याचे पदपथही बळकावण्यात आले आहेत. काही व्यावसायिकांनी पदपथांवर दुकानाचे साहित्य मांडल्याचे दिसून येते. निगडीतील लोकमान्य टिकळ चौकात ही समस्या मोठी आहे. बेशिस्त रिक्षाचालकांकडूनही रस्त्यात रिक्षा उभ्या करण्यात येतात.पदपथ पादचाऱ्यांसाठी आहेत की, व्यावसायिक, हातगाडी आणि पथारीवाल्यांसाठी आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. प्रशस्त रस्त्यांमुळे शहराची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणे अपेक्षित आहे. मात्र काही रस्त्यांचा अपवाद वगळता बहुतांश रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. नाशिक फाटा येथे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते. फुगेवाडीकडून पिंपरीकडे येणाºया रस्त्यावर महामेट्रोचे काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद झालेला आहे. त्यामध्येही जुनी वाहने खरेदी-विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. खरेदी-विक्रीसाठीची वाहने तेथे भर रस्त्यावर असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन सातत्याने कोंडी होते. नाशिक फाटा येथील उड्डाणपुलाखाली हॉटेल आणि अन्य व्यवसाय थाटण्यात आलेले आहेत. हॉटेलमध्ये येणाºया ग्राहकांसाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही. हॉटेलचे ग्राहक रस्त्यात वाहने पार्किंग करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. बेशिस्त रिक्षाचालक रस्त्यावरच रिक्षा थांबवितात. खरेदी विक्रीच्या चारचाकी वाहनांमुळे पदपथ बळकावले आहेत. पिंपरीकडून फुगेवाडीकडे जाताना नाशिक फाटा येथे खरेदी-विक्रीची वाहने पदपथावर आणि रस्त्यात असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.कारवाईचा केवळ ‘फार्स’महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून पदपथावरील अतिक्रमण, हातगाडीधारक यांच्यावर कारवाई होते. मात्र कारवाई झाल्यानंतर पदपथावर व रस्त्यावर भाजी विक्रेते, हातगाडीधारक पुन्हा ठाण मांडतात. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन कारवाई केवळ ‘फार्स’ ठरत असल्याची परिस्थिती आहे. त्यासाठी ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.शहरातील प्रत्येक चौकामध्ये वाहतूककोंडी होते. बहुतांश पदपथांचा पादचाºयांना वापर करता येत नाही. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक कारवाईसाठी येते. पथकाकडून कारवाई होणार असल्याची माहिती अतिक्रमण केलेल्या विक्रेते आणि व्यावसायिकांना मिळते. त्यामुळे पथक कारवाईसाठी दाखल होण्यापूर्वीच असे विक्रेते आणि व्यावसायिक गायब झालेले असतात. पथक गेल्यानंतर विक्रेते आणि व्यावसायिक पुन्हा पदपथावर आणि रस्त्यात ठाण मांडतात.शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण पाहवयास मिळते. पदपथावर ठाण मांडलेले विक्रेते आणि व्यावसायिक सामान्य नागरिक आणि वाहनचालकांशी अरेरावी करतात. पदपथ त्यांच्या मालकीचेच आहेत, अशा आविर्भावात ते असतात. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करावेत.- चेतन चौधरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, थेरगाव
पिंपरी तील पदपथांचा श्वास कोंडलेलाच! विक्रेते, व्यावसायिकांनी मांडले ठाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 2:24 AM