पिंपरी : लाकडी दांडक्याने पोलिसाला मारहाण केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी दोघांना पोलिसांनीअटक केली. लालटोपीनगर, पिंपरी येथे शुक्रवारी (दि. ३०) दुपारी ही घटना घडली.
रामदास सोपान लुकर (वय ६५) आणि सतीश पवार (वय ४०, दोघेही रा. लालटोपीनगर, पिंपरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी पंडीत लक्ष्मणराव धुळगंडे यांनी शुक्रवारी (दि. ३०) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस कर्मचारी पंडीत हे मोरवाडी, पिंपरी येथे विनामास्कची कारवाई करीत होते. त्यावेळी आरोपींनी संगनमत करून फिर्यादी पोलीस कर्मचारी पंडित यांना शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून गेले. दंडाच्या पावतीचे पुस्तक हिसकावून घेतले. फिर्यादी पंडित यांच्याशी झटापटी केली. त्यांना नोकरी घालविण्याची धमकी दिली. पोलीस कर्मचारी आरोपींना कारवाईसाठी पोलीस चौकीला घेऊन येत असताना आरोपी पवार हा पोसिलांच्या हाताला झटका देऊन पळून गेला. तर आरोपी लुकर याने लाकडी पोकळ दांडक्याने फिर्यादीच्या कपाळावर मारून पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.