पिंपरी : मोबाईल फोनचे सीडीआर आरोपीला दिल्या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत बुधवारी रात्री उशिरा आदेश दिले.
लक्ष्मण नावजी आढारी असे निलंबित कलेेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट चार येथे आढारी कार्यरत होते. आरोपीची पत्नी ही चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाच्या संपर्कात असल्याचा संशय संबंधित आरोपीला होता. त्यामुळे त्याबाबत खात्री करून घेण्यासाठी संबंधित आरोपीने पोलीस कर्मचारी लक्ष्मण आढारी यांच्याशी संपर्क साधला. आरोपीने त्याच्या पत्नीच्या मोबाइलचा सीडीआर काढून देण्याचे सांगितले. त्यानुसार लक्ष्मण आढारी यांनी आरोपीला त्याच्या पत्नीच्या मोबाइलचा सीडीआर काढून दिला. संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी चौकशी दरम्यान त्याच्या मोबाइलमध्ये त्याच्या पत्नीच्या मोबाइलचा सीडीआर मिळून आला. त्याबाबत चौकशी केली असता, लक्ष्मण आढारी यांनी सीडीआर काढून दिल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलीस आयुक्त यांनी लक्ष्मण आढारी यांच्या निलंबनाचे आदेश दिले.