विश्वास मोरे / पिंपरीश्रीलंकेवर स्वारी करताना प्रभुरामचंद्रांच्या वानरसेनेने महासागरात सेतू उभारला होता, अशी पौराणिक कथा आहे. कलीयुगातही पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात वानरसेना निर्माण झाली आहे. त्या ‘वानरसेने’ने कलावंत, नागरिक यांच्या सहकार्यातून पिंपरीतील रेल्वेस्थानकावरील भिंती रंगवून स्थानकाचे रूपडे बदलविले आहे. पुणे-मुंबई लोहमार्गावर पिंपरी येथे रेल्वेस्थानक आहे. वर्षभरापूर्वी या स्थानकाची अवस्था अत्यंत वाईट होती. तेथील स्वच्छतागृहातही प्रवेश करणे अवघड झाले होते. तसेच स्थानकावरील भिंतीवर गुटखा, तंबाखू खाणाऱ्यांच्या पिचकाऱ्यांनी रांगोळी काढून अशा प्रवाशांची मनोवृती किती विकृत आहे, याचे यथार्थ दर्शन घडविले होते. दुसरीकडे स्थानकांवरील शेडचे पत्रे फुटलेले, सर्वत्र अस्वच्छता, गर्दुल्यांचा वावर, रेल्वेविभागाचेही या स्थानकाकडे फारशे लक्ष नाही, अशी दयनीय अवस्था. या स्थानकाला दत्तक घेण्याचा निर्णय पिंपरीतील थ्रिसेन क्रुप या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतला. कंपनीच्या सीएसआरमधून गेल्या वर्षभरापासून रेल्वे स्थानकाचे रूपडे बदलविण्याचा संकल्प केला. सुरुवातीला स्थानकावरील एका स्वच्छतागृहाची दुरुस्ती केली. त्यानंतर शेडवरील तुटलेले पत्रे बदलले, दुरुस्ती केली. त्यानंतर पुण्यातील वानरसेना या ग्रुपच्या माध्यमातून एका दिवसात रेल्वेस्थानकच रंगवून काढले. या उपक्रमात पुणे शहरातील ४५ कलावंत, सुमारे सहाशे तरुण-तरुणी कामगार सहभागी झाले होते. भिंत रंगविताना केवळ रंग न देता, त्यातून प्रबोधन व्हावे, समाज जागृती व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. एक दिवस वानरसेना रेल्वेस्टेशनवर अवतरली आणि त्यांनी रूपडे बदलून टाकले. स्वच्छ भारत अभियान, शिक्षण, भारतीय संस्कृती, सायकलिंग, हरितक्रांती, महिला सक्षमीकरण, क्रीडा, कला यावर ग्राफीटी केली. पिंपरी-चिंचवडचे वैशिष्टय असणाऱ्या भक्ती-शक्ती शिल्प प्रतिकृतीही चित्रातून साकारली. सुरुवातीला कलावंतांनी स्केचेस काढली त्यानंतर वानरसेनेने त्यात रंग भरले. एका दिवसात वानरसेनेने रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. उपक्रमाविषयी वानरसेनेचे संस्थापक स्वप्निल कुमावत म्हणाले, ‘‘वानरसेना आणि थ्रिसेनच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात आला. रेल्वे स्थानकावरील भिंतीची अवस्था दयनीय झाली होती. तसेच तंबाखू खाणाऱ्यांनी खूप घाण केली होती. त्या भिंतीस प्लास्टर केले. त्यानंतर या उपक्रमात लोकसहभाग वाढवा, म्हणून आम्ही नागरिकांना सोशल मीडियावरून आवाहन केले. शेकडो तरुणांनी नोंदणी केली.’’डॉक्टर, इंजिनिअर, अभियंते, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा समावेश होता. भिंत नुसतीच रंगवायची नव्हती तर त्यातून सामाजिक संदेश कसा देता येईल, याचा विचार करण्यात आला. सुमारे साडेसहाशे जण या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत हा उपक्रम सुरू होता. सुमारे साडेदहा हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची जागा रंगवून काढली. श्रमदानातून हे काम करण्यात आले. वानरसेनेने केलेल्या या उपक्रमातून सामाजिक भान देण्यात आले.
पिंपरी रेल्वेस्थानकाचे तरुणाईने बदलले रूपडे
By admin | Published: April 10, 2017 2:37 AM