पिंपरी : स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. यात चार पीडित महिलांची सुटका करून स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि. १) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे ही कारवाई केली.
आलीम उद्दीन अब्दुल समद (वय २५, रा. वडगाव शेरी रोड, विमाननगर, पुणे, मूळ रा. आसाम), असे अटक केलेल्या स्पा सेंटर मॅनेजरचे नाव आहे. त्याच्यासह स्पा मालक असलेल्या महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी शनिवारी (दि. २) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील साई चौक, जगताप डेअरी येथे कॅसल स्पा ॲण्ड वेलनेस सेंटर येथे स्पाच्या नावाखाली महिलांकडून पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचून छापा टाकून कारवाई केली. यात पश्चिम बंगालच्या दोन तसेच महाराष्ट्रीय दोन महिला अशा चार पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी सहा हजार २०० रुपयांची रोकड, १४ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, असा २० हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक डाॅ. अशोक डोंगरे, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, कल्याण महानोर, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, मोहिनी थोपटे, सुधा टोके, सेशमा झावरे, भगवान मुठे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, सचिन गोनटे, जालिंदर गारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.