पिंपरी : पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने मान्यता दिल्यानंतर पुणेमेट्रो प्रशासनाने शनिवारी (दि. १६) बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पुणे मेट्रोचे दोन मार्ग मंजूर आहेत. यात स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका (पीसीएमसी) भवन या मार्गाचा समावेश होतो. यातील फुगेवाडी ते पिंपरी या मार्गावर सहा मार्च २०२२ रोजी प्रवासी वाहतूक सुरू झाली. तर फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट स्थानक ऑगस्ट २०२३ रोजी सुरु झाला होता. या दोन्ही मार्गाचे लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका हाच मार्ग पुढे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढवावा, अशी नागरिकांची मागणी होती. या विस्तारीत मार्गाचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्याला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने २३ ऑक्टोंबर रोजी मान्यता दिली होती. पण, प्रत्यक्षात हे काम कधी सुरु होणार याची उत्सुकता पिंपरी चिंचवडकरांमध्ये होती. पण, आता पुणे मेट्रो प्रशासनाने पिंपरी ते निगडी या ४.५१९ किलोमीटर ऐलिव्हेटेड मार्गांच्या बांधकामाची निविदा शनिवारी (दि. १६) प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नवीन वर्षात या मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. प्रशासनाचे १३० आठवड्यात हे बांधकाम पुर्ण करण्याचे नियोजन आहे. या मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डी आणि निगडी ही स्थानके असणार आहेत.