पिंपरी: शहरात वाहन चोरीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. घरासमोर पार्क केलेली वाहने चोरीला जात आहेत. अशाच प्रकारे चोरट्यांनी शहरातून तीन दुचाकी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागरिक खरेदीसाठी बाहेर पडल्यावर सार्वजनिक ठिकाणी वाहने पार्क करतात. त्या एक दोन तासात वाहने पळवून लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. तर घरासमोरही पार्क केलेली वाहने चोरीला गेल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहने पार्क करताना दक्षता बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पहिल्या घटनेत मुक्तार अहमद सन्नाउल्ला खान (वय २७, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान यांनी त्यांची दुचाकी राहत्या घरासमोर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास पार्क केली होती. ही दुचाकी रविवारी सकाळी सातच्या सुमारास चोरीस गेल्याचे दिसून आले.
दुसऱ्या घटनेत पार्वती माणिक रहाटकर (वय ३०, रा. चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रहाटकर यांनी त्यांची दुचाकी टाटा मोटर्स कंपनीच्या मेन गेटसमोरील पार्किंगमध्ये ३० मार्च रोजी सकाळी सव्वासहाच्या सुमारास पार्क केली होती. दुपारी सव्वातीनच्या सुमारास दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले.
तिसऱ्या घटनेत सचिन शिवराम बोऱ्हाडे (वय ३८, रा.भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोऱ्हाडे यांनी २७ मार्चला रात्री आठच्या सुमारास आळंदी रोड, भोसरी येथील मंगलमूर्ती मेडिकल समोरील सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी पार्क केली होती. त्यानंतर ते खरेदीसाठी गेले. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. बोऱ्हाडे खरेदी संपवून अर्ध्या तासानंतर परतले असता त्यांची दुचाकी चाेरीला गेल्याचे उघडकीस आले.