पिंपरी : शहरातील पिंपरी विधानसभेच्या आमदारपदाची स्वप्ने भारतीय जनता पक्षातील स्थानिक नेत्यांना पडू लागली आहेत. उमेदवारीसाठी इच्छुकांनी आत्तापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.भाजपात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने ‘उमेदवार निवडीसाठी’ पक्षनेतृत्वाचा कस लागणार आहे. तसेच युती झाल्यास हा मतदार संघ शिवसेना की भाजपा किंवा आरपीआय आठवले यापैकी कोणास जातो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.विधानसभेची निवडणूक वर्षावर येऊन ठेपली आहे. युतीमध्ये या मतदार संघात शिवसेनेचे आमदार निवडून आलेले आहेत. मात्र, पुढील निवडणुकीत युती होणार नसल्याने सत्ताधारी भाजपात अनेक इच्छुकांनी आत्तापासूनच उमेदवारीचे मनसुभे रचले आहेत. पिंपरी विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षित आहे. मागील निवडणुकीत भाजपाने ही जागा आरपीआय आठवले गटाला सोडली होती. त्यामुळे चंद्रकांता सोनकांबळे यांना संधी मिळाली होती. भाजपाचे कमळ हे चिन्ह नसल्याने अडीच हजार मतांनी पराभव होऊन शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांचा विजय झाला होता. तर तिसऱ्या क्रमांकावर राष्टÑवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे होते.भाजपा आघाडीचा उमेदवार अत्यंत काठावर पराभूत झाल्याने हा मतदार संघ भाजपाला पोषक आहे, असे इच्छुकांचे मत आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेशी युती झाली तरी भाजपाच्या वतीने दावा केला जाणार आहे. तर याच जागेवर आठवले गटही दावा करणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपातून लढण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे.
पिंपरी विधानसभेचे इच्छुकांना लागले डोहाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 6:57 AM