पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात दिवाणी आणि फौजदारी न्यायालय आहे़ मोरवाडी चौकातील इमारतीतील जागा कमी पडत असल्याने न्यायालयाचा विस्तार करणे अवघड झाले होते. मात्र, जागेच्या प्रश्नाबाबत बार असोसिएशन, महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात बैठक झाली. ‘ महापालिकेची अजमेरा कॉलनी येथील इमारत मोरवाडी न्यायालयासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. मोरवाडी येथे एकच न्यायालय सुरू आहे. मात्र, न्यायालयासाठी ही जागा कमी पडत आहे. पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी न्यायालयासाठी मोठी जागा देण्याची मागणी केली आहे. प्राधिकरणाच्या मोशीतील जागेत आरक्षणही विकसित करण्यात येणार आहे. मात्र, त्यास गती मिळालेली नाही. याबाबत तात्पुरता तोडगा काढावा, अशी मागणी असोसिएशनने केली होती.दरम्यान या प्रश्नासाठी गुरुवारी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला पक्षनेत्यांसह बार असोसिएशनचे अध्यक्ष किरण पवार, सुहास पडवळ, सतीश गोरडे, सुनील कड, श्रीकांत दळवी, विजय भगत आदी उपस्थित होते. बैठकीविषयी माहिती देताना एकनाथ पवार म्हणाले, ‘‘अजमेरा कॉलनी येथे महापालिकेची इमारत आहे. २४ वर्ग असलेली इमारत डॉ. डीय. वाय. पाटील महाविद्यालयाला भाडेतत्त्वार दिली होती. आता ती इमारत पालिकेच्या ताब्यात आहे. न्यायालयासाठी ती इमारात भाडेतत्त्वावर देण्याचे तत्त्वत: मान्य करण्यात आले आहे. ’’‘लोकमत’च्या वृत्ताचीही दखलपिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या वर्धापनदिनी ‘लोकमत’ने न्यायालयास जागा मिळणार कधी? असे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल शासनाने घेऊन मोशीत जागाही आरक्षित केली होती. तात्पुरती जागा उपलब्ध व्हावी, अशीही मागणी केली होती. त्यास मुहूर्त मिळाला आहे.
पिंपरी न्यायालयाचा होणार विस्तार, महापालिकेचा ग्रीन सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 6:42 AM