पिंपरी : चिखली येथे रविवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास भीषण आग लागून लाकडी गोदाम जळून खाक झाले. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून आग आटोक्यात आली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
चिखली येथे अहमद खान यांचे एम. के. ट्रेडर्स नावाने लाकडी भंगार मालाचे गोदाम आहे. या गोदामाला पहाटे पावणेपाचच्या सुमारास अचानक आग लागली. लाकडाचे गोदाम असल्याने आगीने त्वरित पेट घेतला. आगीच्या ज्वाळा, धुराचे लोळ हवेत पसरले. स्थानिकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर अग्निशामक दलाला कळविले. अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. पिंपरी अग्निशामक दलाचे तीन तर भोसरी, तळवडे आणि प्राधिकरणचा प्रत्येकी एक अशा सहा बंबांचा वापर करून आग आटोक्यात आणण्यात आली. गोदाम मात्र जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.या परिसरात भंगार मालाच्या गोदामांना आग लागण्याच्या घटना वांरवार घडू लागल्या आहेत. आजुबाजुला भंगार मालाची मोठी गोदामे तसेच लोकवस्ती असल्याने अशा आगीच्या घटनांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या भागात अग्निशामक केंद्र उभारावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र त्याची महापालिका प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही.