नारायण बडगुजर
पिंपरी : सॅटेलाईट लहरींव्दारे कोणीतरी माझ्या मेंदूवर नियंत्रण मिळवत असून, त्यांना पाहिजे असलेले विचार माझ्यावर लादले जात आहेत, त्यामुळे मला धोका आहे, अशी व्यथा एका उच्चशिक्षित तरुणाने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे मांडली आहे. तसेच याबाबत विदेश मंत्रालयाकडे देखील इ-मेलव्दारे पत्रव्यवहार केला आहे. संबंधित तरुणाचे म्हणणे ऐकून पोलीस देखील बुचकळ्यात पडले आहेत.
पुणे जिल्ह्यातील हा तरुण सध्या एका आयटी कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरीला आहे. उच्चशिक्षित असलेल्या या तरुणाने काही नोकरीनिमित्त परदेशवारी देखील केली आहे. प्रगत देशांमध्ये त्याने नोकरीही केलेली आहे. सध्या नोकरीनिमित्त हा तरुण पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आपल्याला विचित्र अनुभव येत असल्याचे या तरुणाकडून सांगितले जात आहे.
काही जण तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या मेंदूवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विचित्र आवाज ऐकायला येतात. ते थेट माझ्या मेंदूशी संवाद साधून मेंदूला सूचना करून काहीतरी कृत्य करण्यास मला भाग पाडले जाते. तसेच विशिष्ट विचार माझ्या मेंदूवर रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून माझ्या भावना तसेच इतर सवयींवर नियंत्रण मिळविले जात आहे. माझ्या मेंदूत विचार टाकून स्वप्नरंजन केले जात आहे. मोठमोठी स्वप्न रंगविली जात आहेत असल्यासारखे वाटते. तसेच मी माझ्या डोळ्यांनी जे पाहतो, ते सर्व संबंधित व्यक्तींना देखील दिसते. हा प्रकार व्हिडिओ गेमसारखाच असून, यातून निगराणीचा प्रकार केला जात आहे. मी इतरांशी काय बोलतोय किंवा काय बोलावे यावर देखील ते नियंत्रण मिळवतात. मी विचार न केलेले संगीत व गाणी देखील माझ्या मेंदूत भरविली जातात. कोणीतरी सॅटेलाईट किंवा इतर तंत्रज्ञानाचा वापर करून लहरींव्दारे मानवी मेंदूवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयोग करीत आहे. त्यासाठी माझा वापर केला आहे, असे संबंधित तरुणाकडून पोलिसांना सागण्यात आले आहे.
देशभरात ४०० जणांवर प्रयोग?
संबंधित उच्चशिक्षित तरुणाच्या म्हणण्यानुसार हा प्रयोग देशभरातील ३०० ते ४०० जणांवर सुरू आहे. त्या सर्वांना एकत्र आणले जात आहे. संपर्कासाठी त्यांचा एक व्हाटसअप ग्रुप तयार केला आहे. हा त्रास होत असलेल्या माझ्यासह इतर काही जणांनी शारीरिक तपासण्या केल्या. तसेच मानसोपचार तज्ज्ञांचा देखील सल्ला घेतला. मात्र त्यानंतरही हा प्रकार थांबलेला नाही.
''अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतले जाते. त्यांची मानसिक स्थिती समजून घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. कायदेशीर शक्य असेल तेवढी मदत केली जात असल्याचे मनीष कल्याणकर (जनसंपर्क अधिकारी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी सांगितले.''
''अशा प्रकरणांमध्ये संबंधिताना समजून घेतले पाहिजे. तसेच वेळावेळी समुपदेशन केले पाहिजे. अशा व्यक्तींसोबत विशिष्ट परिक्षेत्रात जसे की, त्यांचे कामाचे ठिकाण, घर आदी ठिकाणी असे प्रकार जास्त घडत असल्याचे दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये समुपदेशनानंतरही असे प्रकार सुरूच असल्याचे संबंधित व्यक्तींकडून सांगण्यात येते असे डाॅ. मनजित संत्रे (मानसोपचार तज्ज्ञ) यांनी सांगितले.''