पिंपरी : दोन अल्पवयीन मुलांकडून तीन जिवंत काडतुसांसह एक पिस्तूल जप्त करण्यात आले. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पिंपरी चौकात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चौकाजवळ एका पानटपरीवर दोन अल्पवयीन मुले थांबली असून, त्यांच्याजवळ एक पिस्तूल असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता, एकाच्या कमरेला पिस्तूल आणि दुसऱ्या मुलाजवळ तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी एकूण २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा अल्पवयीन मुलांविरुद्ध यापूर्वीही दोन गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे,पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, रामदास मुंढे, पोलीस हवालदार सुहास गुजर, पोलीस हवालदार अंकुश यादव यांच्या पथकाने केली.>पिस्तुलासह सराईताला अटकपिंपरी : एका सराईत गुंडाला निगडी पोलिसांनी मोरेवस्ती, चिखली परिसरात पिस्तुलासह अटक केली. ही घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. सागर ऊर्फ एसपी अनुरथ पोटभरे (वय २९, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक सराईत गुन्हेगार पिस्तूल घेऊन मोरेवस्ती येथे येणार असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, निगडी पोलिसांनी मोरेवस्ती परिसरात सापळा लावला. एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. ताब्यात घेतलेल्या आरोपीविरोधात निगडी आणि देहूरोड पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत.
पिस्तूल, काडतुसासह दोघे पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 2:25 AM