लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पीएमपीचा मार्ग सांगणाऱ्या पाट्या प्रवाशांना दिसतील अशा जागी लावणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर त्या पाट्यांवर रात्रीच्यावेळी प्रकाश असणेसुद्धा आवश्यक आहे. परंतु पीएमपीच्या बहुतांश बसेसच्या पाट्या या खाली बसच्या काचेच्या येथे लावण्यात येतात. त्याचबरोबर त्यावर रात्रीच्यावेळी प्रकाशही नसतो. त्यामुळे प्रवाशांना रात्रीच्यावेळी कुठल्या मार्गावरील बस आहे, हे समजणे अवघड जात असल्याचे चित्र आहे.पीएमपी ही पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक सेवा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवासी पीएमपीने प्रवास करीत असतात. सुरुवातीपासूनच सक्षम वाहतूक व्यवस्था पुरविण्यात पीएमपी प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र आहे. मधल्या काळात तुकाराम मुंडे यांनी ही व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता पुन्हा परिस्थिती बदलत असल्याचे चित्र आहे.बस ज्या मार्गावर धावत आहे, त्या मार्गाची पाटी ही प्रवाशांना दिसेल अशा भागात लावणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर रात्रीच्यावेळी त्यावर प्रकाश असणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रवाशांना बस कुठली आहे, हे कळण्यास मदत होईल. परंतु पीएमपीच्या अनेक जुन्या बसेसच्या पाट्या या चालकाच्या शेजारील काचेच्या येथे खालच्या भागात लावण्यात येत असल्याने प्रवाशांना कुठल्या मार्गावरील बस आहे, हे समजणे अवघड जात आहे. खासकरून रात्रीच्यावेळी कुठली बस आहे, हे लांबून कळत नाही. बसजवळ आल्यानंतरच त्यावरील पाटी वाचता येते.अनेकदा बसवरील पाटी अंधारात वाचता येत नसल्याने प्रवासी बसच्या समोर येत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच अनेकदा कुठली बस आहे, हे कळत नसल्याने बस चुकण्याचेही प्रकार घडत असतात.पिंपरी-चिंचवड मधील अनेक मार्गांवरील बसच्या पाट्या नसतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. याबाबत उपाययोजना करावी.रूपा भुतके ही तरुणी म्हणाली, अनेक बसेसच्या पाट्या या खालच्या भागात लावण्यात येत असल्याने त्या पटकन दिसत नाही. या पाटीवर लाईटही नसते. तसेच बसच्या प्रखर लाईटमुळे ही पाटी वाचताही येत नाही. त्यामुळे बस जवळ आल्याशिवाय ती कुठल्या मार्गावरील बस आहे, हे समजत नाही.बसवरील पाटी वाचता न आल्याने अनेकदा बस चुकली आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने योग्य ठिकाणी पाटी लावून त्यावर लाईट लावायला हवी. नाव न छापण्याच्या अटीवर पीएमपीचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, नव्या बसेसला एलईडी स्क्रीन असल्याने त्यांच्या पाट्यांचा प्रश्न येत नाही.ज्या बसेसला एलईडी स्क्रीन नाही त्या बसेसच्या पाट्यांवर आम्ही येत्या काळात लाईट लावण्याची व्यवस्था करणार आहोत. तसेच जे चालक एलईडी स्क्रीन सुरु करत नाहीत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.
पाट्यांना मिळेना जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 6:46 AM