रावेत : जाहिरातदारांकडून शहरातील झाडांवर जाहिरातबाजी करण्यात येत आहे. त्यासाठी झाडांवर खिळे ठोकण्यात येत आहेत. याबाबत उपाययोजना करून अशा जाहिरातबाजांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र महापालिका प्रशासनाकडून याबाबत दुर्लक्ष करण्यात येत होते. ‘लोकमत’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने याबाबत गुन्हा दाखल करण्याची जाहीर नोटीस बजावली.शहरातील झाडांवर सर्रास खिळे ठोकण्याचे प्रकार काही जाहिरातबाजांकडून करण्यात येत आहे. काही झाडांना ताराही बांधण्यात येत आहेत. त्यामुळे झाडांच्या संवर्धनात अडचणी येत आहे. याबाबत उपाययोजना करून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. ‘लोकमत’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. दोषी व्यक्ती आणि जाहिरातबाजांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. याची दखल घेऊन सहायक आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी जाहीर नोटीस काढून झाडांवर जाहिरात करणाऱ्यांवर महाराष्ट्र विरूपण प्रतिबंध अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची समज दिली आहे. झाडांवर लावण्यात आलेल्या जाहिराती संबंधित जाहिरातदारांनी तीन दिवसांमध्ये काढून घ्याव्यात, असे आदेशही देण्यात आले आहेत.झाडांना खिळे आणि वेदनामुक्त करण्यासाठी शहरातील काही संघटनांनी पुढाकार घेतला. अंघोळीची गोळी संस्था आणि इतर सामाजिक संस्था चार महिन्यांपासून यासाठी अभियान राबवित आहे. या अभियानांतर्गत झाडांवरील खिळे आणि तारा काढण्यात येत आहेत. अंघोळीची गोळी आणि इतर सामाजिक संस्थांनी निगडी प्राधिकरण, चिंचवड येथील संभाजीनगर, रस्टन कॉलनी, थेरगावमधील रस्त्यांवरील झाडांचे १० हजार खिळे काढले आहेत. या अभियानात चाळीसहून अधिक सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत. ट्री अॅक्टनुसार झाडांना इजा पोहोचविणे गुन्हा आहे. त्यानुसार कारवाई करून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी अंघोळीची गोळी संघटनेतर्फे महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्याबाबत निवेदनही देण्यात आले होते. अंघोळीची गोळी संघटनेचे माधव पाटील, अशोक तनपुरे, अॅड. सोमनाथ हरपुडे, तुषार शिंदे, अनिल पालघर आदींनी निवेदन दिले होते.खिळेमुक्त झाडे या चळवळीचे हे यश आहे. सर्व सामाजिक संघटना आणि ‘लोकमत’चा यात सिंहाचा वाटा आहे. पिंपरी-चिंचवडमधील झाडांवरचा शेवटचा खिळा निघेपर्यंत ही चळवळ अशीच चालू राहील. पिंपरी-चिंचवड महापालिकने उचलेले पाऊल नक्कीच अभिनंदनास्पद आहे. आता महाराष्ट्राच्या सर्व पालिकांनी याचे अनुकरण करावे.- माधव पाटील, अध्यक्ष, अंघोळीची गोळी
झाडे होणार खिळेमुक्त; महापालिका प्रशासनाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:26 AM