लोकमत न्यूज नेटवर्कखडकी : प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग वापरण्यास जरी बंदी असली, तरी खडकीत सर्वत्र कॅरिबॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, रस्त्यावर बाजारात सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा खच पडलेला दिसत आहे. याच प्लॅस्टिकच्या पिशव्या रस्त्यावर सोडलेली मोकाट जनावरे खात असून, यापासून या जनावरांना पोटाचे व आतड्यांचे आजार जडत आहेत. या ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांना असलेल्या बंदीची कडेकोट अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी खडकीकरांनी केली आहे.खडकीतील महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गंगा हाइट्स चौक, टीकाराम चौक, खडकी बाजार एमएसईबी चौक आदी ठिकाणी मोकाट जनावरे कळपाने बसलेले असतात अथवा फिरत असतात. बाजारातील कापड व्यापारी त्यांच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या रस्त्यावरच फेकतात. त्यामुळे बाजारातील प्रत्येक दुकानासमोर प्लॅस्टिकचा डोंगर झालेला दिसतो. या पिशव्यांमध्ये खाण्यासाठी काही आहे का, या शोधात जनावरे असतात. अनेकदा ही जनावरे पिशव्या खाताना दिसतात. त्यामुळे या जनावरांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे. दरम्यान, अशी मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात ठेवण्यासाठी एका पथकाची नेमणूक कॅन्टोन्मेंट बोर्डाने केली आहे. मात्र, त्यांच्याकडून हवी तशी कार्यवाही केली जात नाही.
जनावरे खाताहेत प्लॅस्टिकच्या पिशव्या
By admin | Published: July 17, 2017 4:06 AM