पिंपरी : शहर व उपनगर परिसरात गणेशोत्सव उत्साहात पार पडला. या गणेशोत्सवात पीएमपीच्या तिजोरीतही चांगलीच भर पडली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीने जादा बसचीही व्यवस्था केल्याने एकूण चार लाख २० हजाराचा जादा महसूल मिळाला आहे.गणेशोत्सवात गणरायाच्या दर्शनासह देखावे पाहण्यासाठी अनेक गणेशभक्त घराबाहेर पडतात. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक पुण्यात जातात. यासाठी वाहनांची आवश्यकता असते. त्यामुळे पीएमपीने गणेशोत्सवात जादा बस मार्गावर सोडल्या होत्या. रात्री दहा ते पहाटेपर्यंतच्या कालावधीत सोडण्यात आलेल्या बसमुळे पीएमपीच्या तिजोरीतही चांगलीच भर पडली आहे.भोसरी डेपोतून गणेशोत्सव काळात रात्री दहा ते पहाटेपर्यंतच्या कालावधीत अनेक बस मार्गावर सोडण्यात आल्या होत्या. या कालावधीत १ लाख ९६ हजारांचे उत्पन्न डेपोला मिळाले. तर निगडी डेपोला तब्बल २ लाख २० हजारांचे उत्पन्न मिळाले. या डेपोतूनही विविध मार्गावर बस सोडल्या होत्या.गणेशोत्सवात पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातही गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशा गर्दीत स्वत:चे वाहन घेऊन गेल्यास वाहतूककोंडीत भर पडते. तसेच वेळही वाया जातो. त्यामुळे अनेक जण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देतात. त्यानुसार पीएमपी बसने अनेक जण प्रवास करीत असल्याने बसला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीएम प्रशासनाकडून पहाटेपर्यंत बससेवा सुरू ठेवली जाते. तसेच जादा बसही मार्गावर सोडल्या जातात. यामुळे पीएमपीच्या उत्पन्नात भर पडते. निगडी आणि भोसरी डेपोला यंदाच्या गणेशोत्सवात केवळ रात्री दहापासून पहाटेपर्यंत सव्वाचार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.रिक्षा अथवा इतर खासगी वाहनांचे भाडे अधिक असते. हे भाडे सामान्य नागरिकाला परवडत नाही. त्यामुळे अनेक जण पीएमपी बसचा वापर करतात. मनपा भवन थांब्यावर उतरून पुढील देखावे पाहणे सोयीचे ठरत असल्याने शहरातील अनेक जण मनपा भवन बसने जात असतात. यामुळे मनपा भवन मार्गाच्या बस जास्त प्रमाणात सोडल्या.
पीएमपीच्या तिजोरीत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 2:15 AM