पुणे : गळके छत, फुटलेल्या काचा यांमुळे प्रवाशांना अनेक बसमधून भिजतच प्रवास करावा लागत आहे. अनेक बसथांब्यांचीही दुरवस्था झाल्याने पावसात उभे राहणेही कठीण होत आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. दरम्यान, पीएमपीच्या मालकीच्या जवळपास ७० टक्के बस पावसासाठी सज्ज असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. पूर्वमोसमी पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली आहे. लवकरच मॉन्सूनच्या सरी कोसळण्यास सुरूवात होईल. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पीएमपी प्रशासनाकडून बसेसच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले जाते. मागील महिनाभरापासून हे काम हाती घेण्यात आले आहे. पीएमपीच्या ताफ्यात मालकीच्या सुमारे १३७५ व भाडेतत्त्वावरील ५७५ बस आहेत. मालकीच्या ४३० हून अधिक बस ११ वर्षांपुढील असून त्यापैकी बहुतेक बस खिळखिळ्या झाल्या आहेत. काही बसच्या छताचा पत्रा उचकटलेला आहे, तर काही बसच्या खिडक्यांच्या काचा गायब आहेत. काही बसच्या चालकाच्या समोरील काचाही फुटलेल्या आहेत. या बस खूप जुन्या असल्याने त्याचे सुटे भाग उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे दुरूस्ती करताना अडथळे येतात. तात्पुरती मलमपट्टी करून त्यावरच काम भागवावे लागते. काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे प्रवाशांना गळक्या बसचा अनुभव येत आहे. काही बसच्या दोन्ही बाजूच्या खिडकीच्या काचा निघालेल्या आहेत. तर काही बसच्या छताचे पत्रे तुटलेले आहेत. काही बसला हवेसाठी छताला मोकळी जागा ठेवण्यात आली होती. त्याचे झाकणही तुटलेले आहे. या छतातून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर बसमधे येऊ शकते. बसच्या खिडकीच्या काचाही नीट लागत नसल्याने त्याचा काहीच उपयोग होत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. दोन्ही बाजूला दरवाजे असलेल्या बसपैकी काही बसचे उजव्या बाजूचे दरवाजे तुटलेले आहेत. त्यामुळे त्यातूनही पावसाचे पाणी आत येऊ शकते.
.पावसाळा सुरू होणार असल्याने मागील महिनाभरापासून बस दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत ७० टक्के बस दुरूस्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये खिडक्या दुरूस्ती, गळके छत, काचा, वायपर व इतर गोष्टींचा समावेश आहे. काही वेळा कामे करूनही पावसातच प्रत्यक्ष छत कुठे गळत आहे, हे समजते, असा दावा पीएमपीतील अधिकाºयांकडून केला जात आहे. ..............पुणे व पिंपरी चिंचवडसह लगतच्या परिसरात जवळपास साडेतीन हजारांहून अधिक बसथांबे आहेत. त्यापैकी सुमारे दीड हजार थांब्यांना शेड नाही. तर काही शेडच्या छताची दुरावस्था झाली आहे. थांब्याची दुरूस्तीची जबाबदारी या थांब्यावर जाहिरात लावणाºया जाहिरातदाराची आहे. तर जिथे जाहिराती नाहीत त्या थांब्यांची देखभाल पीएमपीचा स्थापत्य विभाग करतो. पण दोन्हींकडूनही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. प्रवासी आशा शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी सुतारवाडी येथील एका बसथांब्याचे छत दुरूस्त करण्यासाठी तक्रार दिली होती. पण आजपर्यंत हा थांबा दुरूस्त न केल्याचे त्यांनी सांगितले. ..............