पिंपरी: मागील काही महिन्यांपासून बस ठेकेदारांची बिले थकली होती. त्यामुळे ठेकेदार पीएमपीकडे बिलांची मागणी करत होते. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने गुरुवारी, २१ एप्रिलला ठेकेदारांची थकीत ५८ कोटी रुपयांची बिले अदा केली आहेत. मात्र, त्यानंतरही ठेकेदारांनी अचानक संप पुकारला आहे. पीएमपीच्या १४०० ते १५०० बस मार्गावर असतात त्यापैकी ६५० बस ठेकेदारांच्या असतात, त्यात इ बसचाही समावेश आहे.
पीएमपीमध्ये सुमारे सात खाजगी ठेकेदारांच्या ९५६ बस भाडेतत्त्वावर धावतात. यापैकी सुमारे ६५० ते ७०० बस दररोज मार्गांवर धावतात. या बसची वाहतूक शुक्रवार सकाळपासून बंद झाली. त्यामुळे पीएमपी प्रशासनाची तारांबळ उडाली. याबाबत एका खाजगी ठेकेदाराकडे विचारणा केली असता गेल्या आठ महिन्यांची १०७ कोटी रुपयांची थकबाकी अद्याप मिळाली नसल्याबद्दल हा संप केला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ठेकेदारांपैकी बीव्हीजी ग्रूपने संपातून अंग काढून घेतले असून त्यांच्या १०० बस मार्गांवर आल्या आहेत.
ठेकेदारांच्या बसवरील चालकांनी पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे ठेकेदारांबाबत तक्रार केली होती. त्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी किंवा अन्य कोणतीही सुविधा दिली जात नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार मिश्रा यांनी सर्व रेकॉर्ड तपासण्याचा आदेश दिला होता. या विषयात पीएमपी प्रशासनाने लक्ष घालू नये, यासाठी ठेकेदारांनी दबाव तंत्राचा अवलंब केल्याचा पीएमपी प्रशासनाचा दावा आहे.