पिंपरी : हिंजवडी-माण आयटी पार्क परिसरात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे (पीएमआरडीए) १२ भूखंड ८० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहेत. यातून आयटी पार्क परिसराचा सुनियोजित विकास होण्यास आणि नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, तसेच यातून पीएमआरडीएला ५० कोटींचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा पीएमआरडीए प्रशासनाने व्यक्त केली आहे.
मुळशी तालुक्यातील पाच गावांमधील विविध अमेनिटिजसाठी भूखंड ऑनलाइन लिलावपद्धतीने भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहेत. त्यासाठी २० मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत लिलावासाठी नोंदणी करता येईल. ६ ते ११ एप्रिल दरम्यान लिलावधारकांच्या कागदपत्रांची पडताळणी होईल. १२ एप्रिलला सकाळी ११ वाजतापासून ऑनलाइन लिलाव प्रक्रिया सुरू होईल. यशस्वी लिलावधारकांची यादी १७ एप्रिलला प्रसिद्ध केली जाईल. याबाबत पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर माहिती दिली आहे.
...या सोयीसुविधांसाठी भूखंड
उद्याने, मैदाने, क्रीडा संकुले, मनोरंजन केंद्र, वाचनालय, आरोग्य केंद्र, रुग्णालय, दवाखाना, कॅफेटेरिया (कॅन्टीन), दुकानांसाठी गाळे, पार्किंग, प्राथमिक व माध्यमिक शाळा, टपाल कार्यालय, पोलीस ठाणे, वीज उपकेंद्र, एटीएम, बँक, इलेक्ट्रॉनिक-सायबर लायब्ररी, ओपन मार्केट, योगा केंद्र, वीजपुरवठा, पाणीपुरवठा केंद्र, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, क्बल हाउस, अग्निशामक केंद्र, विद्यार्थी होस्टेल, नोकरदार महिलांसाठी वसतीगृह इत्यादी सोयीसुविधा या भूखंडांवर विकसित करता येणार आहेत.
८० लाखांपासून पावणेदहा कोटींपर्यंतचे भूखंड
लिलाव होणाऱ्या या १२ भूखंडांमध्ये किमान ८० लाखांपासून ते नऊ कोटी ६५ लाख रुपये मूळ किंमत असलेले भूखंड आहेत. किमान १० गुंठ्यापासून दोन एकर क्षेत्रापर्यंतच्या या भूखंडांची मूळ किंमत ३६ कोटींपर्यंत आहे. मात्र लिलावातून या भूखंडांना ५० कोटी रुपयांपर्यंतची किंमत मिळेल, असा दावा पीएमआरडीए प्रशासनाने केला आहे.
सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने पारदर्शकता राहणार
मुळशी तालुक्यातील पाच गावांमध्ये सुविधा क्षेत्रांतर्गत १२ भूखंड भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन लिलाव होईल. लिलावधारक नोंदणी करून या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने पारदर्शकता राहणार आहे. - रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, पीएमआरडीए
मुळशी तालुक्यातील या गावांमध्ये आहेत भूखंड
गाव – भूखंडभूगाव – २हिंजवडी – ४कासार आंबोली – १माण – ३पिरंगुट – २