पिंपरी : मोशी येथील एका तरुणाला डेंग्यूची लागण झाली. त्यानंतर त्याला न्यूमोनिया झाला. या तरुणाचा सोमवारी वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला. तरुणाचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला की न्यूमोनियामुळे झाला?, असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु मृत्यू न्यूमोनियाने झाला असे रुग्णालयाने सांगितले. पिंपळे गुरव येथील एका तरुणाला सुरुवातीला डेंग्यू झाला होता. त्यानंतर त्याला न्यूमोनियाची लागण झाली आणि त्याचा मृत्यू झाला. परिणामी, डेंग्यू आणि न्यूमोनिया जीवघेणा ठरत असल्याची स्थिती आहे. न्यूमोनिया फुफ्फुसाचा संसर्ग आहे, तो जीवाणू किंवा विषाणूमुळे होऊ शकतो. न्यूमोनिया हा एक सामान्य आजार आहे, परंतु त्याची काळजी न घेतल्यास मृत्यू होऊ शकतो.
न्यूमोनिया हा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होणारा श्वसन संक्रमण आहे, ज्यामुळे एक किंवा दोन्ही फुफ्फुसांच्या हवेच्या पिशव्या सुजतात. हवेच्या पिशव्या द्रवाने भरतात, ज्यामुळे कफ किंवा पू सह खोकला, ताप, थंडी वाजून येणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागाने केले आहे.
दुष्परिणाम
- अशक्तपणा येणे- फुप्फुसांमध्ये पाणी किंवा पस भरणे श्वासोच्छ्वास घेताना त्रास होणे, तो अपुरा पडणे- संपूर्ण शरीरात संसर्ग होणे- मेंदूत पस होणे- हृदयाला संसर्ग होणे
लक्षणे
खोकला, ताप, डोकेदुखी, श्वासोच्छवासाची समस्या, छाती दुखणे, स्नायू दुखणे
कारणे?
आपण ज्या वातावरणात राहतो, त्यात अनेक प्रकारचे जिवाणू व विषाणू असतात. त्यांच्या हल्ल्यामुळे न्यूमोनिया होतो. फुप्फुसाचा आधीच काही आजार असेल तर हा न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. दुसऱ्या एखाद्या आजारासाठी रुग्णालयात ४८ तासांपेक्षा जास्त वेळ राहावे लागले तर काही जणांना न्यूमोनिया होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले अशा रुग्णांना न्यूमोनियाचा धोका इतरांपेक्षा अधिक असू शकतो. न्यूमोनिया वेगवेगळे प्रकार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
''वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्या तरुणाला उलटी झाली होती. ती त्यांच्या फुफ्फुसात गेली. त्यामुळे त्याला न्यूमोनियाची लागण झाली. न्यूमोनियामुळे त्याचा मृत्यू झाला. श्वसनावाटे जाणाऱ्या विषाणूमुळे न्यूमोनिया होतो. तर डासांच्या माध्यमातून डेंग्यू होतो. त्यामुळे दोन्ही आजार होण्याची कारणे वेगळी आहेत. -डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.''