पिंपरी : लष्कर प्रमुखांचा शहर परिसरात दौरा झाला. त्यावेळी बंदोबस्तावरील पोलीस मोबाईलवर बोलणे, चॅटींग करणे, असे प्रकार करताना दिसून आले. यामुळे लष्करी अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे पोलिसांनी यापुढील काळात ज्यांना परवानगी असेल त्यांनीच मोबाईलचा वापर करावा, असे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले. त्यामुळे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
लष्कर प्रमुख शुक्रवारी पिंपरी चिंचवडच्या हद्दीतून जाणार होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त होता. या बंदोबस्ता दरम्यान अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी मोबाइलवर बोलण्यात आणि चॅटींग करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. यामुळे बंदोबस्ताकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. याबाबत लष्करी अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे बंदोबस्ताच्यावेळी ज्यांना मोबाइल वापरण्याची परवानगी दिली असेल त्यांनीच त्याचा वापर करावा. बंदोबस्ताच्या ठिकाणी मोबाइलवर बोलताना किंवा विनापरवाना वापर करताना आढळून आल्यास सदर बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच याबाबतचा कसुरी अहवाल संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.