पिंपरी : रिक्षाच्या प्रतीक्षेत रस्त्यावर थांबलेल्या प्रवाशाचा मोबाईल फोन हिसकावून चोरटा पळून जात होता. त्यामुळे प्रवाशाने आरडाओरडा केला. त्यावेळी तेथून जात असताना रात्रगस्तीवरील पोलिसांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी पाठलाग करून चोरट्याला पकडले. काळभोरनगर, चिंचवड येथे मंगळवारी (दि. १४) पहाटे सव्वादोनच्या सुमारास हा प्रकार घडला. अभिजित सोमनाथ दौंड (वय १८) असे पोलिसांनी पाठलाग करून पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार गणेश जाधव (वय २२, दोघे रा. आकुर्डी) याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी दौंड याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पांडुरंग साहेबराव जाधव (वय ४२, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांनी प्रवासासाठी मोबाइल अँपव्दारे ऑनलाइन रिक्षा बुक केली होती. काळभोरनगर येथे रिक्षाची प्रतीक्षा करीत असताना दुचाकीवरून आरोपी अभिजित दौंड व गणेश जाधव हे दोघे तेथे आले. यातील गणेश जाधव दुचाकी चालवत होता. त्याने फिर्यादी पांडुरंग जाधव यांच्यापासून काही अंतरावर दुचाकी थांबविली. दुचाकीवरून उतरून आरोपी दौंड याने पांडुरंग यांच्याजवळ येऊन त्यांच्याकडील बळजबरीने हिसकावला. त्यानंतर तेथून पळून जात दुचाकीकडे त्याने धाव घेतली. याप्रकारामुळे पांडुरंग यांनी आरडाओरडा केला. त्याचवेळी पिंपरी पोलिसांची रात्रगस्तीवरील पथकाची गाडी तेथून जात होती. पोलिसांची गाडी थांबल्याचे पाहून दुचाकीचालक आरोपी गणेश जाधव याने दुचाकीवरून धूम ठोकली. पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे तपास करीत आहेत.
दुचाकीपर्यंत पोहचण्यापूर्वीच गाठले आरोपीलापांडुरंग जाधव यांना आरडाओरडा करताना पाहून गस्तीवरील पथकाने त्यांची गाडी तेथे थांबविली. मोबाइल फोन हिसकावून चोरून नेला असल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यामुळे पथकातील पोलीस उपनिरीक्षक रमेश केंगार, त्यांच्या वाहनावरील पोलीस कर्मचारी भरत सोनवणे आणि पोलीस कर्मचारी प्रशांत जाधव यांनी पळून जात असलेल्या आरोपी अभिजित दौंड याचा पाठलाग केला. काही अंतरावर दुचाकी घेऊन आरोपी गणेश जाधव थांबला होता. मात्र त्या दुचाकीपर्यंत पोहचण्यापूर्वीच आरोपी अभिजित याला पोलिसांनी शिताफीने पकडले.
आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांनी अटक केलेला आरोपी अभिजित दौंड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरोडा प्रकरणी हा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.