पिंपरी : नववधूला घेऊन पाचगणी, महाबळेश्वरला फिरायला जात असलेल्या तरूणावर दुचाकीवरून आलेल्या चौघांनी वाईजवळील पसरणी घाटात हल्ला केला. त्यात आनंद कांबळे (वय ३१, रा. औंध, पुणे) याचा मृत्यू झाला. लुटमारीच्या उद्देशाने हा प्रकार घडला असल्याचे वरकरणी दिसून आले. मात्र प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून निगडी येथून निखिल मळेकर (वय २८, रा.निगडी ओटास्किम) या संशयित आरोपीला महाबळेश्वर पोलिसांनी रविवारी सकाळीच अटक केली आहे.
औंध येथील नवविवाहित तरुण आनंद , पत्नी दिक्षा हिच्यासह मित्र राजेंद्र बोबडे, त्याची पत्नी कल्याणी हे चौघे एका मोटारीतून शनिवारी दुपारी १ वाजता महाबळेश्वरला निघाले. तीन च्या सुमारात पसरणी घाटात ते होते. दिक्षाला उलट्या होऊ लागल्याने मोटार रस्त्याच्या बाजुला थांबवली. दिक्षा आणि आनंद दोघे खाली उतरले. दरम्यान दोन दुचाकीवरून चौघे त्या ठिकाणी आले. त्यांनी दिक्षा व आनंद यांना निरखून पाहिले. काही अंतर पुढ जाऊन दुचाकीस्वार परत आले. त्यांनी आनंदच्या डोक्यात घारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेला आनंद रक्ताच्या थारोळ्यात पडला. अवघ्या १३ दिवसांपुर्वी विवाह झालेल्या आनंदचा हल्यात मृत्यू झाला. आनंदबरोबर आलेले दांपत्य मोटार घेऊन पुढे निघून गेले. त्यांनी थेट पाचगणी पोलीस ठाणे गाठले. तेथे जाऊन पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी आनंदला वाई येथील रूग्णालयात आणेल. तेथून सातारा येथील रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी आनंदला मृत घोषित केले. लुटमारीच्या उद्देशाने घडलेला प्रकार असावा असे पोलिसांना सुरूवातीला वाटले. मात्र याबाबत चौकशी केली असता, प्रकरणाला वेगळे वळण मिळाल्याचे लक्षात आले. दिक्षा ज्या परिसरात राहत होती. त्या निगडी ओटास्किम परिसरात राहत असलेल्या निखिल मळेकर बाबत त्यांना माहिती मिळाली. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी निखिल मळेकर या संशयित आरोपीला निगडी येथून ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी अधिक शक्यतांचा तपास पाेलीस करीत अाहेत.