पिंपरी : इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून गाईंची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. यामध्ये सहा आरोपींना अटक करून २५ लाख २० हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिघीपोलिसांनी ही कारवाई केली.
मोसीन बाबु कुरेशी (वय २८), मोहम्मद शाहिद रहेमान सुलेमान कुरेशी (वय ४२), हाशिम मोहम्मद अब्दुल रहेम कुरेशी (वय २१), अशरफ सुलेमान कुरेशी (वय ३२), मोहम्मद अरिफ सुलेमान कुरेशी (वय ५२, सर्व रा. ठाणे), सोहेल फारूक कुरेशी (वय ३३, रा. धारावी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तपासात नऊ आरोपींची नावे निष्पन्न झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी-आळंदी परिसरात गाईंना बेशुद्ध करत त्यांना कत्तलीसाठी नेण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचा तपास करत असताना २८ डिसेंबरला दिघी येथे नंबरप्लेट नसलेले वाहन संशयीतरित्या दिसले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला. वाहन घेऊन आरोपी कच्च्या रस्त्याकडे गेले व तेथेच गाडी सोडून ते टाटा कम्युनिकेशनच्या जंगलात पळून गेले. पोलिसांनी गाडीच्या इंजिनच्या नंबरवरून मालकाचा शोध घेतला. ही गाडी सहा जणांना विकली असून सध्या तिचा मालक हा मोशिन कुरेशी असून तो मिरारोडला राहतो, असे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी १९ जानेवारीला मोशीनचा मोबाईलनंबर मिळवला व तांत्रिक तपासाद्वारे त्याच्या इतर साथिदारांचीही नावे निष्पन्न केली.
पोलिसांनी २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत मुंबई येथून सहा आरोपींना अटक केले. त्यांच्याकडून पोलिसांनी चारचाकी तीन गाड्या, दोन सत्तुर, तीन कोयते, रस्सी, लोखंडी कानस, पिशवी, इंजेक्शन, औषधांच्या बाटल्या, नंबर प्लेट असा एकूण २५ लाख २० हजार ९८० रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी आरोपीवरील १३ गुन्हे उघडकीस आणले. यात दिघी येथील तीन, पिंपरीतील तीन, भोसरी पोलीस ठाण्यातील दोन, देहुरोड पोलीस ठाणे, वाकड, खेड, कोंढवा व हडपसर येथील प्रत्येकी एक अशा गुन्ह्यांची उघड झाली. आरोपींना न्यायालया सोमर हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली.
दिघी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक दिलीप शिंदे, उपनिरीक्षक सुनील भदाणे, पोलीस कर्मचारी चिंतामण फलके, प्रदीप खोटे, किशोर कांबळे, सतीष जाधव, बाळासाहेब विधाते, किरण जाधव, रामदास दहिफळे, बाबाजी जाधव, भाग्यश्री जमदाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.