पिंपरी : बंद फ्लॅटचे लॅच उचकटून घरातील दागिने आणि रोख रक्कम असा ९७ लाख २० हजारांचा ऐवज चोरणाऱ्यांना निगडी पोलिसांनी शिताफीने अटक केली. यामध्ये तिघांना ताब्यात घेतले असून एक फरार आहे
निगडी परिसरातील भक्ती-शक्ती चौकाजवळ ही चोरीची घटना शनिवारी घडली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सुत्रधार रखवालदार गोविंद कालु परियार ( रा. कलाली, लमकी, देश - नेपाळ) याच्यासह दोन साथीदारांना मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले मध्य प्रदेशातील खांडवा रेल्वे स्थानकावरून त्यांना अटक केली आहे.(विनोद राजकुमार अगरवाल (रा. सेक्टर नंबर 23, पंचवटी बांगला, भक्ती-शक्ती चौक, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद हा अगरवाल यांच्या बंगल्यामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता. अगरवाल कुटुंबीय दोन दिवसांपूर्वी घरगुती कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. शनिवारी रात्री घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत गोविंद याने विनोद यांचा तिस-या मजल्यावरील फ्लॅट आणि त्यांचा भाऊ संदीप अगरवाल यांचा दुस-या मजल्यावरील फ्लॅटचे लॅच तोडले. घरातील वॅाडरोब आणि बेडरूम मधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप, डायमंड सेट व रोख रक्कम असा एकूण ९७ लाख २० हजार रुपयांचा ऐवज घेऊन गोविंद पसार झाला होता.