पिंपरी : गुन्हे शाखा युनिट तीन आणि वाहन चोरी विरोधी पथकाने एका सराईत वाहन चोराला अटक केली. त्याच्याकडून दोन लाख १० हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. निगडी येथे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर खंडू गांडगे (वय २१, रा. देहूगाव, मूळ रा. नाथापूर, बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. निगडी येथील मधुकरराव पवळे उड्डाणपुलाजवळ एक तरुण थांबला आहे. त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट तीन आणि वाहन चोरी विरोधी पथकाच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून ज्ञानेश्वर गांडगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन झाले. त्यावरून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पिंपरी-चिंचवड आणि परिसरातून सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. गांडगे याच्याकडून पोलिसांनी दोन लाख १० हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.
गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस कर्मचारी विवेकानंद सपकाळे, हजरत पठाण, सचिन उगले, पोलीस हवालदार विठ्ठल सानप, गंगाधर चव्हाण, जमीर तांबोळी, सचिन मोरे, यदू आढारी, योगेश्वर कोळेकर, महेश भालचिम, नाथा केकाण, राजकुमार हनमते, सागर जैनक, त्रिनयन बाळसराफ यांच्या पथकाने ही कारवाई केली.