पिंपरी : विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने हटकले. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी येथे सोमवारी (दि. २७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
युनूस गुलाब अवतरणार (वय ५०), मतीन युनूस अवतरणार (वय २८), मोईन युनूस अवतरणार (वय २४, सर्व रा. भारत माता चौक, काळेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शंकर विश्वंभर कळकुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कळकुटे हे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने जमावबंदी व संचारबंदी आहे. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी काळेवाडी येथे विनाकारण रस्त्यावर फिरत होते. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना हटकले. या कारणावरून आरोपी यांनी त्यांच्याशी वाद घातला. आरोपी युनूस अत्तार याने व त्याच्या दोन्ही मुलांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या हातातील काठी हिसकावण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.