पिंपरी : अपघात करून पळून जात असलेल्या इराणी तरुणाने पोलिसांना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. ही घटना शनिवारी (दि. २८) सकाळी औंध-सांगवी रस्त्यावर, सांगवी वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
शहा वली बोर अली अकबर रहमान (वय २६, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी, मूळ रा. इराण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक फौजदार रवींद्र महाडिक यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर अपघात झाल्याने वाहतूक पोलीस घटनास्थळी गेले. त्यावेळी आरोपी रहमान हा त्याच्या ताब्यातील दुचाकी विरुद्ध दिशेने भरधाव वेगात चालवू लागला. त्याने पुढे एका दुचाकीला धडक दिली आणि तो खाली पडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी फिर्यादी यांच्यासोबत असलेले सहायक सहायक फौजदार अनंत यादव, पोलीस कर्मचारी संतोष सपकाळ यांना धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादी असलेले सहायक फौजदार रवींद्र महाडिक यांना मारहाण करून रस्त्यावर पाडले. याबाबत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
आरोपीचे भारतातील वास्तव्य बेकायदेशीर
आरोपी शहा वली बोर अली अकबर रहमान हा शिक्षणासाठी भारतात आला. त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा पाहिला असता तो १७ ऑक्टोबर २०२२ रोजी संपला आहे. त्यानंतर तो भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत असून पिंपरी येथील एका महाविद्यालयात बी फार्मसीचे शिक्षण घेत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.