पिंपरी : पिंपरी–चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. शहरात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना पत्रकारांना लांब ठेवले जात होते. याबाबत पत्रकारांनी थेट अजित पवार यांना प्रश्न विचारत पोलिसांकडून पत्रकारांना का अडवले जात आहे? अशी विचारणा केली. यावेळी अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलवून खडे बोल सुनावले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना बोलवून घेत फैलावर घेतले. चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात महापालिकेच्या कार्यक्रमासाठी अजित पवार आले. यापूर्वीही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना या संदर्भात सूचना दिल्या असतानाही आजही पोलिसांनी अजित पवार यांच्याकडे पत्रकार जात असताना त्यांची अडवणूक केली. त्यामुळे अखेर पत्रकारांनी अजित पवार यांच्याकडे पोलिसांची तक्रार केली आणि अजित पवार यांनी चौबे यांना खडेबोल सुनावले.
नेमके अजित पवार काय बोलले?
बंदोबस्तामुळे तुमचे लोक पत्रकारांना पुढे येऊ देत नाहीत. पत्रकारांना पुढे येऊ दिले पाहिजे, त्यांना थांबवू नये. आता असे होणार नाही, याची काळजी घ्या. सर्व पक्षीय नेते आल्यास त्यांना त्यांचे काम करू द्या. त्यांच्याशी बोलायचे की नाही हा आमचा अधिकार आहे.