पिंपरी : पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी वर्षभरात ५१ गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोकां’तर्गत कारवाई केली. पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयांतर्गत आतापर्यंत एकाच वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात ‘मोका’ची कारवाई पहिल्यांदाच झाली. आयुक्त चौबे यांनी साधलेल्या अर्धशतकी ‘मोका’मुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्तांनी विविध उपाययोजना केल्या. विनय कुमार चौबे यांनी १४ डिसेंबर २०२२ रोजी पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर लक्ष केंद्रित केले. सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर ‘वाॅच’ ठेवण्याचे त्यांनी निर्देश दिले. तसेच सराईतांच्या गुन्ह्यांची कुंडली तयार करून महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ (मोका) अतंर्गत कारवाई केली. यात डिसेंबरमध्ये १२ टोळ्यांवर ‘मोका’ लावत ६० सराईतांवर कारवाई केली. २०२३ या वर्षभरात एकूण ५१ टोळ्यांमधील ३५७ सराईत गुन्हेगारांवर मोकाची कारवाई झाली.
कारवाई केलेल्या टोळ्यांच्या १२ टोळी प्रमुखांनी त्यांच्या साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्ह्यात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेऊन स्वतःची संघटीत टोळी तयार करून गुन्हे केले. याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त चौबे यांनी केल्या होत्या. त्यानुसार सादर प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करून ‘मोकां’तर्गत कारवाईचे आदेश अपर पोलिस आयुक्त वसंतपरदेशी यांनी पारीत केले.
पोलिस उपायुक्त विवेक पाटील, काकासाहेब डोळे, संदीप डोईफाडे, स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सतीश माने, बाळासाहेब कोपनर, डॉ. विशाल हिरे, डॉ. विवेक मुगळीकर, राजेंद्र गौर, विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, रणजित सावंत, ज्ञारेश्वग काटकर, शिवाजी गवारे, अशोक कदम, रामचंद्र घाडगे, राम राजमाने, पोलिस निरीक्षक संतोष पाटील, बाळकृष्ण सावंत, पोलिस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सांगवी पोलिसांकडून ‘ट्रिपल मोका’
टोळी प्रमुख आनंद सुनील साळुंके उर्फ लोहार (१९, रा. खडकी) यांने त्याच्या वेगवेगळ्या साथीदारांसह विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले. त्यानुसार त्याच्यासह त्याच्या साथीदारांवर सांगवी पोलिसांनी ‘मोकां’तर्गत तीन कारवाया केल्या. आनंद याच्या टोळ्यांवर ‘ट्रिपल मोका’ लावत पोलिसांनी दणका दिला आहे. यासह वाकड पोलिस ठाण्यांतर्गत टोळी प्रमुख रोहन ऊर्फ गंग्या वासुदेव वाघमारे (२८, रा. चौधरी पार्क, वाकड), चाकण पोलिस ठाण्यांतर्गत टोळी प्रमुख शुभम युवराज सरोदे (२१, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड), भोसरी पोलिस ठाण्यांतर्गत टोळी प्रमुख अक्षय नंदकिशोर गवळी (२८, रा. खडकी), चिखली पोलिस ठाण्यांतर्गत टोळी प्रमुख मन्नु ऊर्फ अतिष बलदेव कोरी (२१, रा. घरकुल, चिखली), निगडी पोलिस ठाण्यातंर्गत टोळी प्रमुख मोहम्मद ऊर्फ मम्या मेहबुब कोरबु (२८, रा. आझाद चौक, ओटास्किम, निगडी), टोळी प्रमुख लखन ऊर्फ बबल अवधुत शर्मा (१९, रा. दळवीनगर, चिंचवड), पिंपरी पोलिस ठाण्यांतर्गत टोळी प्रमुख प्रकाश ऊर्फ डब्बल सुरेंद्र राम (३०, रा. बौध्द नगर, पिंपरी), टोळी प्रमुख आकाश ऊर्फ जिलब्या यादव गायकवाड (२६, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड) यांच्यासह त्यांचे साथीदार यांच्यावर ‘मोकां’तर्गत डिसेंबरमध्ये कारवाई केली.