पुणे : खून प्रकरणातील फरारींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर संशयितांनी गोळीबार केला. तेव्हा पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आरोपींवर झाड फेकून मारले होते. त्यात पकडलेल्या आरोपीकडे येरवडा कारागृहात मोबाईल आढळून आला आहे. त्यामुळे कारागृहातील मोबाईल जॅमरवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. अश्विन आनंदराव चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या न्यायालयीन कैद्याचे नाव आहे. याबाबत तुरुंग अधिकारी अमोल जाधव (वय ३७, रा. लोहगाव) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक एक, बॅरेक क्रमांक एकमध्ये शुक्रवारी रात्री दोन वाजता घडला.
याबाबतची माहिती अशी, पिंपळे गुरव परिसरात भरदिवसा गोळीबार करुन योगेश जगताप यांचा खून करण्यात आला होता. त्यातील आरोपी हे चाकण परिसरातील कोये गावी असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली होती. पोलिस आल्याचे समजताच आरोपींनी गोळीबार करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तेथील पडलेले झाड उचलून आरोपींच्या अंगावर फेकले होते. त्यावेळी तिघा आरोपींना पकडण्यात आले होते. सध्या ते न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात बंदिस्त आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातील बॅरेक क्रमांक एक मधील खिडकी क्रमांक २ मध्ये गस्त घालणार्या सुरक्षा रक्षकांना मध्यरात्री २ वाजता एक मोबाईल आढळून आला. त्यात बॅटरी व सिमकार्डही आढळून आले. कारागृहात बंदी असतानाही हा मोबाईल अश्विन चव्हाण याने आणला असल्याचे दिसून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करीत आहेत.