पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचा १५ आॅगस्टचा मुहूर्त साधला जाणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या व्यक्तीची आयुक्तपदावर नेमणूक केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या नव्या पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त होण्याचा बहुमान पद्मनाभन यांना मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस आयुक्तपदाची संधी कोणाला मिळणार या चर्चेत महामार्ग सुरक्षा, वाहतूक विभागाचे आयुक्त आऱ के़ पद्मनाभन यांचे नाव आघाडीवर आहे.सत्ताधारी भाजपाकडून आयुक्तपदासाठीच्या अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस केली जाणार आहे. स्वतंत्र आयुक्तालय होणार आहे़ त्या ठिकाणी पोलीस आयुक्त कोण असावेत, या संदर्भात स्थानिक खासदार, आमदारांच्या शिफारशी महत्त्वाच्या ठरणार आहेत. निवडणूक लढण्याची पूर्वतयारी करताना पक्षसंघटन, कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बांधणी, निधीची उपलब्धता, मतदारांवर प्रभाव याचबरोबर पोलीस यंत्रणेचा खुबीने वापर याचाही विचार राजकीय मंडळी वरिष्ठ पातळीवर करीत असतात. पोलीस आयुक्तालय कोणाच्या मतदारसंघात असावे, महत्त्वाच्या पदावरील अधिकारी कोण असावेत, याचीही व्यूहरचना सुरू आहे.
पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी आर. के. पद्मनाभन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 2:36 AM