पिंपरी : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला पिंपरी-चिंचवडचेपोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांना उल्लेखनीय, उत्कृष्ट सेवेबद्दल विशिष्ट राष्ट्रपती पदक जाहीर झाले. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलिस यंत्रणा जबाबदार, उत्तरदायी तसेच सज्ज असावी, त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशी त्यांची भूमिका आहे. त्यानुसार त्यांनी पोलिस दलातील त्यांच्या प्रदीर्घ २६ वर्षांच्या सेवाकाळात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या उत्कृष्ट सेवेची दखल घेत आयुक्त चौबे यांना यापूर्वीही वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
विनय कुमार चौबे हे महाराष्ट्र केडरचे १९९५ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. त्यांनी कानपूर आयआयटीमधून अपारंपरिक ऊर्जा संसाधनांमध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी घेतली आहे. त्यांनी रत्नागिरी, अकोला आणि सोलापूर (ग्रामीण) जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. राज्यपालांचे एडीसी म्हणूनही त्यांनी काम केले. तसेच मुंबईत पश्चिम उपनगरचे पोलिस उपायुक्त म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना २००९ मध्ये पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नती दिली. त्यानंतर त्यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी काम करत जातीय हिंसाचार आणि गंभीर गुन्ह्यांची परिस्थिती यशस्वीपणे हाताळली. त्याची दखल घेत त्यांना २०१२ मध्ये पोलिस पदक आणि २०१० मध्ये पोलिस महासंचालकांच्या मानचिन्हाने सन्मानित करण्यात आले.
विनय कुमार चौबे यांनी २०१६ मध्ये केनेसॉ राज्य विद्यापीठ येथून सायबर सुरक्षा आणि गतिशीलता अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. तसेच सायबर कायद्याचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. परराष्ट्र मंत्रालयात मुंबई येथे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी, म्हणून काम करत असताना त्यांनी पेपरलेस कामकाज करून पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली. पासपोर्ट प्रक्रियेच्या क्रांतीकारक बदलांसाठी नियुक्त केलेल्या समितीत ते महत्त्वाचा घटक होते. नेदरलँड येथील भारतीय दूतावासाच्या भारतीय सांस्कृतिक केंद्रांतर्गत असलेल्या गांधी केंद्राचे समुपदेशक/संचालक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक असताना त्यांनी गुन्ह्याच्या तपासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण दिले. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी प्रतिबंध, एमपीडीए, सायबर गुन्हे आणि ताणतणाव व्यवस्थापन याबाबत त्यांनी राज्य पोलिस दलातील आयपीएस व इतर अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासह मार्गदर्शन केले.
मुंबई येथे आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी एनएसईएल व पॅनकार्ड असे मोठे तिकिट घोटाळे उघडकीस आणले. तसेच मुंबई येथे लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह सीएए/एनआरसी आंदोलन, रामजन्मभूमी निकाल, कलम ३७० रद्द करणे, कोविड महामारी, तसेच लॉकडाऊनची अंमलबजावणी करून कायदा व सुव्यवस्था राखली. मुंबई येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. आता ते पिंपरी -चिंचवड शहर पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
वरिष्ठांकडून संधी मिळाली तसेच मार्गदर्शनही मिळाले. तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी व लोकांनीही सहकार्य केले. त्यामुळे २६ वर्षे उत्तम सेवा बजावता आली. पिंपरी-चिंचवड शहर तसेच राज्य पोलिस दलासाठी आणची चांगले कर्तव्य बजावण्यासाठी प्रयत्नरत आहे.
- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड