लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : परस्पर फ्लॅट विकल्याने बिल्डरवर गुन्हा नोंद करून मदत करण्यासाठी पोलीस हवालदाराने दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यातील एक लाख 70 हजार रुपये घेताना पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ बुधवारी (दि. 31) पकडले.
अमोल दशरथ जाधव (वय 42, दिघी पोलीस स्टेशन) असे रंगेहात पकडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी 42 वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांनी चोवीसावाडी चऱ्होली येथे बिल्डर कडून एक फ्लॅट खरेदी केला होता. बिल्डरने तो फ्लॅट तक्रारदाराच्या परवानगीशिवाय परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकला. त्याबाबत दिघी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यासाठी व पुढे मदत करण्यासाठी पोलीस हवालदार अमोल जाधव याने तक्रारदाराकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी आणती एक लाख 70 हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार बुधवारी दुपारी सापळा रचून पोलीस हवालदार अमोल जाधव याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दिघी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.