नारायण बडगुजर - पिंपरी : तत्काळ मदत उपलब्ध व्हावी म्हणून पोलिसांकडून नियंत्रण कक्षाचा क्रमांक उपबल्ध करून देण्यात आला आहे. मात्र या क्रमांकावर फेक कॉल करून पोलिसांना नाहक त्रास देण्याचेही प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अशा फेक कॉल करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे देखील दाखल केले आहेत.
किरकोळ कारणावरून वाद झाला तरीही पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला जातो. त्यानंतर पोलिसांकडून संबंधित पोलीस ठाण्याकडे त्याबाबत माहिती दिली जाते. पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होतात. मात्र किरकोळ प्रकार असल्याचे समोर येते. यात पोलिसांचा व संबंधित यंत्रणेचा वेळ खर्च होतो.
महिलाही करतात कॉल छेड काढली जातेय, सासरच्यांकडून छळ होतोय, अशा विविध कारणांसाठी महिलांकडून कॉल केले जातात. त्यांनाही पोलिसांकडून तत्काळ मदत केली जाते. काही प्रकरणांमध्ये पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच वाद मिटलेला असतो. काही घडलेच नाही, आम्ही मिटवून घेतले, असे सांगितले जाते.
अत्यावश्यक वेळी कॉल करावानागरिकांच्या सेवेसाठी पोलीस सदैव तत्पर आहेत. मात्र काही नागरिक किरकोळ कारणांसाठीही नियंत्रण कक्षाला फोन करतात. अत्यावश्यक वेळी तसेच संकट काळात कॉल करावा. जेणेकरून पोलिसांचा वेळ वाचून अधिक चांगली सेवा देणे शक्य होईल.- सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड
शेजाऱ्यांची वाद झाल्याचे कॉलशेजारधर्म पाळत शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध असावेत, असे सागंण्यात येते. मात्र शहरात शेजाऱ्यांमध्ये वादाचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद होतात. त्याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली जाते. त्यामुळे पोलिसांना त्यांचा वाद सोडविण्यासाठी घटनास्थळी धाव घ्यावी लागते.
दररोज किमान पाच फेक कॉलपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाकडे येणाऱ्या प्रत्येक कॉलची नोंद केली जाते. तसेच कॉल करणाऱ्या व्यक्तीची माहिती देखील नोंदवून घेतली जाते. यात फेक कॉल करणाऱ्यांचेही प्रमाण जास्त आहेत. असे दररोज किमान पाच फेक कॉल नियंत्रण कक्षाला प्राप्त होतात. त्याबाबत गुन्हे दाखल केले जातात.
नियंत्रण कक्षाला फोन करून एकाने पोलिसांनाच शिवीगाळ केली. त्यामुळे कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फेक काॅल प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल आहे.
कंट्रोल रुमला आलेले कॉलजून - ४४०९जुलै - ४०००१० ऑगस्टपर्यंत - १३२२