पिंपरी : सरत्या २०२४ या वर्षभरात पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले. या सरत्या वर्षात लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका झाल्या. निवडणूक वर्ष ठरलेल्या या काळात पोलिसांचाच बोलबाला राहिला. निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या १२९७ संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाची विभागणी करून १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाले. शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व मोडीत काढतानाच एमआयडीसी आणि मावळातील ‘हार्ड कोअर क्राइम’ला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, तडीपार, स्थानबद्ध करणे अशा कारवाया केल्या. मात्र, २०२३ मध्ये मावळ तालुक्यातील किशोर आवारे हत्या प्रकरण आणि शिरगाव येथील सरपंच खून प्रकरणाने पिंपरी-चिंचवड पोलिस पुन्हा चर्चेत आले. त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्षभरात गुन्हेगारांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली.
२१५ पिस्तूल, ४२० काडतुसे जप्त
पिंपरी-चिंचवड पाेलिसांनी मोठी कारवाई करत २१५ अग्निशस्त्रे व ४२० काडतुसे जप्त केली. अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी २३९ संशयितांच्या विरोधात १६७ गुन्हे दाखल केले. परराज्यातून पिस्तूल आणून विक्री करणाऱ्या रॅकेटचाही पर्दाफाश करत शस्त्र तस्करीची साखळी खंडित केली.
कोयता बाळगणाऱ्यांना कोठडीची हवा
कोयता व धारदार शस्त्र बाळगून वाहनांची तोडफोड करणे, तसेच दहशत पसरविण्याचे काही प्रकार वर्षभरात घडले. पोलिसांनी अशा १०५८ संशयितांवर ७२३ गुन्हे दाखल केले. यात ९०७ शस्त्र जप्त केले.
राेहिंग्यांच्या वास्तव्याने खळबळ
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवर मोठी कारवाई केली. आठ गुन्हे दाखल करून २७ घुसखोरांवर कारवाई केली. रोहिंग्यांनी कुटुंबासह वास्तव्य करत पासपोर्ट मिळवल्याचाही प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. बांगलादेशी घुसखोर तसेच रोहिंग्यांवर पोलिसांनी कारवाई करत ६२ पासपोर्ट रद्द केले.
प्रशासकीय गतिमानता; पोलिस दलात बहुमान
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आयुक्तालयाचे कामकाज गतिमान केले. त्यामुळे प्रलंबित गुन्ह्यांचा तपास, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यास वेग आला. नागरिकांशी सुसंवाद राखणे, तक्रारींची दखल घेण्यावर भर दिला. डायल ११२ वरील काॅलला सरासरी अवघ्या सहा मिनिटांत प्रतिसाद देत राज्य पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा बहुमान देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मिळविला.
देशातील पहिली अत्याधुनिक इमारत
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी शासनाने मोशी येथे नऊ एकर जागा दिली. तेथे पोलिस आयुक्तालयासाठी देशातील पहिली अत्याधुनिक इमारत उभारण्यात येत असून त्यासाठी निधी मंजूर केला. तसेच पोलिस मुख्यालयासाठी ताथवडे येथे ५० एकर जागा, पोलिस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी काळेवाडी फाटा येथे १५ एकर जागा उपलब्ध झाली. तसेच पोलिस भरतीमुळे मनुष्यबळ उपलब्ध झाले. पोलिस दलाच्या ताफ्यात नव्याने १४५ वाहने दाखल झाली.
पाच पाेलिस ठाण्यांची निर्मिती
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शासनाकडून मंजुरी घेऊन सायबर, संत तुकाराम नगर, काळेवाडी, बावधन, दापोडी या नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती केली. पोलिस उपायुक्त परिमंडळांची संख्या दोनवरून तीन केली. परिमंडळ, सहायक आयुक्त कार्यालय तसेच पोलिस ठाण्यांसाठी जागा उपलब्ध करून घेतली.