पिंपरी : संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यासाठी वाहतूकीचे नियमन करताना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीवरील दोघांना आडवले म्हणून त्यांनी महिला पोलीसाशी गैरवर्तन करत विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करत एका वाहतूक पोलिसाला मारून जखमी केले. ही घटना रविवारी (दि.२०) सायंकाळी साते ते साडेसातच्या दरम्यान देहुफाटा चौक, आळंदी येथे घडला. या प्रकरणी महिला पोलीस यांनी दिघी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.२१) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भुषण मनोज जैन (वय ३०, रा. घोलपवस्ती, आळंदी), दत्तात्रय रामा कोकरे (वय २६, रा.गोलेगाव, खेड) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पोलीस स्टाफसह संजीवन सोहळ्यानिमित्त वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीरून आरोपी देहुफाटा चौक येथून आळंदीकडे श्री संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता वाहतूकीस प्रतिबंधित केलेला असताना देखील त्या रस्त्याने दुचाकीवरून जात होते. फिर्यादी यांनी आरोपींना थांबवून दुचाकी पुढे देण्यास मनाई केली. त्यावेळी आरोपी भूषण याने आरडाओरडा करत फिर्यादी यांना ढकलून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच कर्तव्यावर असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपीने मोठमोठ्याने शिवीगाळ केली.
यात आरोपी दत्तात्रय याने भूषण याला साथ दिली. फिर्यादीच्या मदतीसाठी आलेल्या पोलीस कॉन्सटेबल गारोळे यांचा तोंडावर आरोपी भूषण याने फाईट मारून त्यांना जखमी केले. आरोपी पळून जात असताना तेथे असलेल्या जमावाने त्याला लाथ्थाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी जमावाच्या तावडीतून पळून जात असल्याने रस्त्याच्या बाजुला असेलेल्या पोलला धडकल्यामुळे किरकोळ जखमी झाला.