पिंपरी : गणेशोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा, उत्सवाला गालबोट लागू नये, कायदा-सुव्यवस्था राखली जावी या उद्देशाने पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. दीड हजार पोलीस कर्मचारी, तसेच होमगार्ड, स्वयंसेवक,पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते अशी ही एकत्रित यंत्रणा कार्यरत झाली आहे. पुढील काही दिवसांत बाहेरून आणखी पोलिसांची कुमक उपलब्ध होणार आहे, अशी माहिती परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.शहरात गणेशोत्सवाचे उत्साहाचे वातावरण आहे. आठ पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांना त्या त्याभागात बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गणेश मंडळांच्या ठिकाणी रोज भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यास सांगितले आहे. गणेश मंडळाकडून ध्वनिक्षेपकाचा आवाज मर्यादित ठेवला जात आहे का, कोणी नियमांचे उल्लंघन करीत नाही ना, याबाबत दक्षता घेण्यास सांगितले आहे. ध्वनिप्रदूषण करणा-या मंडळांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. पोलिसांच्या मदतीला ५०० स्वयंसेवक तैनात ठेवले आहेत.दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले. पाच दिवसांच्या गणपतींचे होणार आहे. त्याचबरोबर सातव्या दिवशी, नवव्या दिवशी आणि बाराव्या दिवशी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन होणार असल्याने त्या वेळी विसर्जन मिरवणुकीला बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन पोलीस यंत्रणेने केले आहे.ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणामोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करणाºया मंडळांना मंडपाजवळ सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख मंडळांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे दिसून येत आहेत. मंडळांनी त्यांच्या मंडपाजवळ गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंसेवक नेमावेत, अशाही सूचना त्यांना दिल्या आहेत. विसर्जन घाटावरसुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत.डीजे सिस्टीम होणार जप्तमोठ्या आवाजात डीजे लावण्यास बंदी असून कोणत्या मंडळाकडे डीजे लावले असल्याचे दिसून आल्यास यंत्रणा जप्तीची कारवाई केली जाणार आहे. एवढेच नव्हे, तर मंडळांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. मंडळांनी नियमांचे पालन करावे. अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
गणेशोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज; विसर्जनासाठी बंदोबस्त, दीड हजार कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 1:34 AM