देहूरोड : देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्ड, श्रीक्षेत्र देहूगाव, किवळे-विकासनगर, रावेत -प्राधिकरण आदी भागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली असल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाने देहूरोड पोलीस ठाण्याकरिता अधिकारी व कर्मचारी यांची संख्या वाढवावी, अशी मागणी देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अधीक्षक सुवेझ हक यांच्याकडे केली आहे. बोर्डाच्या अर्थ समिती अध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी बुधवारी अधीक्षक हक यांना एक निवेदन दिले आहे. त्यानुसार श्रीक्षेत्र देहू परिसरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत विविध कामे सुरू असल्याने या भागातही अनेक गृहबांधणी योजना सुरू असून लोकसंख्या वाढत आहे. महापालिका हद्दीतील किवळे -विकासनगर व रावेत परिसरात झपाट्याने विकास होत असून, या भागातही नागरीकरण वाढले आहे. ठाण्याच्या हद्दीतून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग व बाह्यवळण महामार्ग जात असल्याने पोलिसांवर वाहतूक सुरळीत ठेवण्याचीही जबाबदारी असते. अधिकारी व कर्मचारी संख्या कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असल्याने अधिकारी व कर्मचारी यांची संख्या वाढवून द्यावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर बोर्डाच्या उपाध्यक्ष अॅड. अरुणा पिंजण व सदस्य ललित बालघरे यांची स्वाक्षरी आहे. (वार्ताहर)
पोलीस अधिकारी, कर्मचारी संख्या अपुरी
By admin | Published: March 25, 2017 3:43 AM