नारायण बडगुजर
पिंपरी : राज्यातील राजकीय तणावातून तोडफोडीचे काही प्रकार समोर आले. त्यामुळे पोलिसांना अलर्ट देण्यात आला. त्या अनुषंगाने शहरातील राजकीय पक्षांच्या कार्यालयांची शनिवारी सायंकाळी पाहणी केली असता शिवसेना भवन, भाजपा आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या पक्षांची कार्यालये कुलूप लावून बंद होती. या कार्यालयाबाहेर किंवा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असल्याचे दिसून आले नाही.
राज्यात राजकीय उलथापालथ होत असल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. मुंबई, पुणे यासह राज्यात काही ठिकाणी शिवसैनिकांनी तोडफोड केली. त्यामुळे शिवसेनेतील दोन गट आमने-सामने येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांना अलर्ट दिला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. तसेच पिंपरी येथे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक, तसेच पदाधिकारी देखील आहेत. पोलिसांकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आकुर्डी येथे खंडोबा माळ चौकात शिवसेना भवन आहे. मात्र शनिवारी तेथे शुकशुकाट होता. भाजपाच्या मोरवाडी येथील शहर कार्यालयात देखील शुकशुकाट होता. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खराळवाडी येथील कार्यालयातही शुकशुकाट होता. सायंकाळी ही कार्यालये कुलूप लावून बंद होती.
अनुचित प्रकार रोखण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून शहरातील काही भागात गस्त वाढविण्यात आली आहे. काही ‘पाॅईंट फिक्स’ केले आहेत. तेथे पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहेत. राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याबाबतही खबरदारी घेतली जात आहे. मात्र, राजकीय पक्षांच्या कार्यालयासाठी कोणताही पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला नव्हता. स्थानिक पोलीस ठाण्यांकडून राजकीय पदाधिकारी, पक्षाच्या शहराध्यक्ष, शहर प्रमुखांना संपर्क साधण्यात आला.
आकुर्डी येथे शिवसेना भवनात दिवसभर नियमित कामकाज सुरू होते. सायंकाळी कार्यालय बंद केले. शहरातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. - सचिन भोसले, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख, शिवसेना
शहरातील राजकीय पक्ष कार्यालय परिसरात गस्त वाढविली आहे. काही ठिकाणे निश्चित केली असून तेथे बंदोबस्त देखील तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून खबरदारी घेतली आहे. - अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
दिवसभर कार्यालयीन कामकाज सुरू होते. सायंकाळी सहानंतर कार्यालय बंद केले. सुरक्षेची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. - अमाेल थोरात, संघटन सरचिटणीस, शहर भाजपा