पिंपरी : हॉटेलमधून सहा लाख ४५ हजार ७५५ रुपयांचा अवैध मद्यसाठा व एक हजार २०० रुपयांची रोकड जप्त केली. मुंबई - बेंगळुरू महामार्गालगत निंबाळकरनगर, ताथवडे येथील हॉटेल कोल्हापुरी व्हेज-नॉनव्हेज येथे छापा टाकला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी (दि. ३०) ही कारवाई केली.
हॉटेलचा मालक अशोक मोहनलाल चौधरी (वय ३३, रा. पवनानगर, चिंचवडगाव), हॉटेलचा मॅनेजर प्रकाश विलास गायकवाड (वय २४, रा. ताथवडे), अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई - बेंगळुरू महामार्गालगत निंबाळकरनगर, ताथवडे येथील हॉटेल कोल्हापुरी व्हेज-नॉनव्हेज येथे अवैधरित्या मद्यसाठा करून गिऱ्हाईकांना त्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानसार सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून शुक्रवारी हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत एक हजार २०० रुपयांची रोकड तसेच सहा लाख ४५ हजार ७५५ रुपये किमतीच्या देशी व विदेशी दारुच्या बाटल्या अवैधरित्या साठविल्याचे मिळून आले. त्यानुसार पोलिसांनी सहा लाख ४६ हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी हॉटेल मालक चौधरी व हॉटेलचा मॅनेजर गायकवाड यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सामाजिक सुरक्षा पथकाचे सहायक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशिल साेळंके, पोलीस कर्मचारी विजय कांबळे, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, भगवंता मुठे, अनिल महाजन, जालिंदर गारे, मारुती करचुंडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.