पिंपरी : अवैध दारुविक्रीप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात देशी-विदेशी तसेच गावठी हातभट्टीची दारु असा ५८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
कारवाईत रवी पोपट तेलंगे (वय २९, रा. चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी सदानंद रुद्राक्षे यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथे रेल्वे पुलाखाली आनंदनगर मालधक्का येथे दारुची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी (दि. १८) कारवाई करून सात हजार ६८० रुपये किमतीच्या दारुच्या १६० बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.
दुसऱ्या कारवाईत दीपसिंग तिरथसिंग भोंड (वय २१, रा. खंडेवस्ती झोपडपट्टी, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी महादेव गजेंद्र जावळे यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. खंडेवस्ती येथे दीपसिंग किराणा मालाच्या दुकानासमोर सार्वजनिक रस्त्यालगत दारुची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा, युनिट एकच्या पथकातील पोलिसांनी शुक्रवारी (दि. १८) कारवाई करून पाच हजार ८८० रुपये किमतीच्या देशी दारुच्या ९६ बाटल्या व १२० रुपयांची रोकड, असा मुद्देमाल जप्त केला.
तिसऱ्या कारवाईत राजकन्या गोणी बिरावंत (वय ४०, रा. हवालदार वस्ती, मोशी) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी मारुती आयप्पा घुगरे यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोशी येथील हवालदार वस्ती येथे इंद्रायणी नदीच्या कडेला गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एमआयडीसी भोसरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. १८) कारवाई करून ४४ हजार ४०० रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू तसेच दारू भट्टीला लागणारी साधने पोलिसांनी जप्त केली.