देहूगाव - येथील देहूगाव म्हाळुंगे गावच्या जुन्या रस्त्याच्या कडेला अज्ञातांनी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून संशयास्पद काहीतरी पुरले असल्याची माहिती मिळाल्याने काल(शनिवार)रात्रीपासुन पोलीस यंत्रणा व महसुल विभागातील अधिकारी यांची मोठी धावपळ करीत झाल्या प्रकरणाचा छ़डा लावला खरा. मात्र घटनास्थळी खोदकाम करून मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यात कुत्रे असल्याचे दिसताच पोलीस व महसुल अधिकारी यांनी हसावे की रडावे अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
पुरलेले कुत्रे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेत सर्वच अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल परिसरातुन कौंतुक होत आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार काल (शनिवार रात्री) सात वाजण्याच्या सुमारास जुन्या देहूगाव म्हळुंगे रस्त्याच्या कडेला काही लोकांनी काहीतरी गाडले असल्याची खबर मिळाली. ही खबर मिळताच देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मनिष कल्याणकर व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीत सदर खड्ड्याच्या कडेला महिलेचा स्कार्प व टॉवेल दिसला. त्यामुळे पोलीसांचा संशयही बळावला होता. सदर खड्ड्यात काहीतरी पुरले असल्याने त्यांनी रात्रभर दोन पोलीस कर्मचारी तेथे बंदोबस्तासाठी ठेवले व सदर घटनेची माहिती महसुल विभागाला कळविण्यात आली. त्यांच्याशी याबाबत पत्रव्यवहाकर करण्यात आला. यानंतर आज(रविवार) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारा महसुल विभागाचे प्रभारी नायब तहसिलदार अंकुश आटोळे, प्रभारी मंडल अधिकारी जी.एफ.सोमवंशी, तलाठी अतुल गीते, पोलीस निरिक्षक मनिष कल्याणकर, पोलीस उपनिरिक्षक छाया बोरकर, देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रणजीत कांबळे हे घटनास्थळी आले. पोलीसांनी या सर्वांच्या समोर घटनास्थळाचा पंचनामा केला.
त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सदरचे खोदकाम करण्यात आले. खोदलेल्या खड्ड्यात पांढऱ्या कपड्यात पोमॉलीन जातीचे कुत्रे असल्याचे आढळून आले. या खड्ड्यात गाडलेले कुत्रे असल्याचे निदर्सनास आल्यावर उपस्थितांना हसावे की रडावे अशी अवस्था झाली होती. मात्र पोलीस निरिक्षक मनिष कल्याणकर म्हणाले की, ठिक आहे, खड्यात कुत्रे मिळाले कोणतीही अनुचित घटना घडलेली नव्हती. अन्यथा एखादा मोठा गुन्हा घडला असता तर त्याचा सर्वांनाच त्रास झाला असता. असे असले तरी या घटनेची पोलीस व महसुल विभागाने ताबडतोब दखल घेतल्याचे दिसून आले आणि तत्पर सेवेची व कार्यक्षम प्रशासन असल्याचे सप्रमाण दाखवून दिल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती.