पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्यानंतर दोन पोलिस भरती कार्यक्रम राबविण्यात आले. आयुक्तालयाच्या जागेच्या अडचणीमुळे हे दोन्ही भरती कार्यक्रम पुणे येथे राबविण्यात आले. आता तिसरी भरती बुधवारपासून (दि. १९) भोसरीतील इंद्रायणीनगरच्या मैदानावर घेतली जाणार आहे. आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर सात वर्षांनी प्रथमच शहरात भरती होणार आहे.
राज्यात एकूण १७ हजार ५३१ पोलिस शिपाई पदांची भरती केली जात आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस दलात २६२ पदांची भरती केली जात आहे. यात सर्वसाधारण उमेदवारांसाठी ७९ पदे, महिला ७८ पदे, खेळाडू १५ पदे, प्रकल्पग्रस्त १४ पदे, भूकंपग्रस्त ४ पदे, माजी सैनिक ४१ पदे, अंशकालीन पदवीधर ११ पदे, पोलिस पाल्य ७ पदे, गृहरक्षक दल १३ पदे, अनाथ ३ पदे भरली जाणार आहेत.
प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यामध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार अपात्र होतील. शारीरिक आणि लेखी चाचणीमधील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार होईल. त्यांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी होईल. त्यामध्ये पात्र ठरलेल्यांची प्रथम तात्पुरती व नंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी ३९६ पोलिस अधिकारी, अंमलदारांची नेमणूक केली आहे. पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही, तर पुढील तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीकरिता हजर राहण्याची सूचना मिळाली असेल, अशा उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल.
प्रवर्गनिहाय भरली जाणारी पदे
ईडब्ल्यूएस - २३
एसईबीसी - २४
इमाव - ९९
विमाप्र - १३
भ.ज.-ड - ०
भ.ज.-क - १२
भ.ज.-ब - ७
वि.जा.-अ - १०
अ.ज. - २०
अ. जा. - ५४
अर्ज करण्यास मुदतवाढ
पोलिस भरतीसाठी ५ मार्चपासून अर्ज मागविण्यात आले. सुरुवातीला अंतिम मुदत ३१ मार्च होती. मात्र, यामध्ये वाढ करत १५ एप्रिल, २०२४ पर्यंत मुदत होती. मुदतवाढ मिळाल्याने, मराठा प्रवर्गातील उमेदवारांसह सर्व उमेदवारांना फायदा झाला.
२६२ जागांसाठी १५ हजार अर्ज
पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील २६२ जागांसाठी १५ हजार ४२ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यात दोन तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे. मैदानी चाचणीसाठी पहिल्या दिवशी ५००, त्यानंतर दररोज १,२०० उमेदवार आणि ५ जुलैरोजी १,६२० उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे. संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलावर मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप होणार असून पिण्याचे पाणी, फिरते प्रसाधनगृह, खाद्यपदार्थांचे स्टॉल, वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पालखी सोहळ्यानिमित्त भरती प्रक्रियेस खंड
१९ जून ते १० जुलै या कालावधीत भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, देहू-आळंदी येथील पालखी सोहळा २५ जून ते ३० जून या कालावधीत शहरात असल्याने या कालावधीत भरती प्रक्रिया खंडित असेल.
पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू, याची खबरदारी घेतली असून डमी उमेदवार उपस्थित राहू नये, यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.
- सुनील रामानंद, पोलिस आयुक्त (प्रभारी), पिंपरी-चिंचवड.