पिंपरी : आई काम सांगते म्हणून १२ वर्षीय मुलगी घरातून निघून गेली. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. अवघ्या तीन तासांत पोलिसांनी शोध घेऊन अल्पवयीन मुलीला तिच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले. पिंपळे निलख येथे रविवारी (दि. १५) रात्री हा प्रकार घडला.सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात इसमाने १२ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी रविवारी रात्री नऊच्या सुमारास सांगवी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या ३३ वर्षीय आईने फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहर परिसर, पुण्यातील बसस्थानके व पुणे रेल्वे स्टेशन येथे ही तपास पथके रवाना करण्यात आली. पुणे रेल्वे स्थानकावर रात्री साडेअकराच्या सुमारास एका फलाटावर अल्पवयीन मुलगी दिसून आली. तिच्याकडे चौकशी केली असता, आई काम सांगते म्हणून घरून निघून आल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर तिला तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्व साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, हेमा सोळुंके, पोलीस कर्मचारी राजश्री माळी, संध्या नरके, भरत पारधी, बापू पोटे, रवींद्र देशमुख, अरुण नरळे यांनी ही कामगिरी केली............पालकांनी मुलांशी मुक्त संवाद करणे आवश्यक आहे. त्यांच्या आकांक्षा व अपेक्षांना ओळखून त्यांचे समुपदेशन केले पाहिजे. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा. जेणेकरून गैरसमज करून घेऊन मुले चुकीचा निर्णय घेणार नाहीत.ज्ञानेश्वर साबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी
आई काम सांगते म्हणून घरातून निघून गेलेल्या मुलीचा तीन तासांत घेतला पोलिसांनी शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 3:35 PM
अज्ञात इसमाने १२ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी आईने दिली होती फिर्याद
ठळक मुद्देपालकांनी मुलांशी मुक्त संवाद करणे आवश्यक